सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापायी आपला सगळा पक्ष संपवायचं ठरवलं आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांचा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

“तिन्ही नगरपंचायती तुम्ही खूप ताकदीनं लढवा. आपल्याला सगळ्याच निवडणुकीत लक्ष द्यायचं आहे. भाजपा क्रमांक एकचा पक्ष होत आहे. आता जिल्हा परिषदेच्या ओबीसी कमिटीच्या आरक्षित केलेल्या पोटनिवडणुका ज्या झाल्या त्याच्यात आपण क्रमांक एकवर आलो. आपल्या २३ जागा आल्या,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

फडणवीसांनी अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीवर व्यक्त केला पश्चात्ताप; म्हणाले “हे नसतं झालं तर…”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “क्रमांक दोनवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघेही राहिले. दोन्ही पक्षांना १७-१७ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या फक्त १२ जागा आल्या. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपला सर्व पक्ष संपावयचं ठरवलं आहे, त्यामुळे त्यांच्या १२ जागा आल्या”. “आज गावागावात भाजपाची ताकद आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत,” असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लागवला.

“आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील. स्थानिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या जिल्हाध्यक्षांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासोबत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय परस्पर घ्यायचा नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

भल्याभल्यांचे मनसुबे धुळीला मिळवत भाजपाने मिळवलेलं यश कौतुकास्पद असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं. यावेळी माजी आमदार शिवाजीरावर नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राहुल महाडिक, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, स्वप्नील पाटील, परशुराम नागरगोजे, रमेश साबळे, विठ्ठल खोत यांचा सत्कार कऱण्यात आला.