गेल्या चार महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असणारे मंत्री नवाब मलिक यांचे प्रथमदर्शनी दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत व्यावहारिक संबंध असल्याच्या दाव्यात तथ्य असल्याचं शनिवारी न्यायालयाने मान्य केलं. यावरून राज्यात आता राजकारण तापू लागलं असून विरोधी पक्षांकडून सत्ताधारी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केली जात आहे. तसेच, नवाब मलिक यांचा राजीनामा अजून का घेण्यात आलेला नाही? असा सवाल देखील भाजपाकडून उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलेलं असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“हसावं की रडावं असा प्रश्न पडतोय”

“महाराष्ट्रात जे चाललंय त्याबद्दल हसावं की रडावं असा प्रश्न पडतोय. नवाब मलिकांचा मुंबईतल्या बॉम्बस्फोटात सहभागी गुन्हेगारांशी असलेला संबंध याविषयी त्यांना अटक करून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. सुरुवातीला त्यांची खाती काढून घ्यायला मुख्यमंत्री तयार नाहीत. नंतर लक्षात आलं की खाती ठेवली तर फायली सहीला तुरुंगात पाठवायला लागतील. त्यामुळे नाईलाजाने खाती काढली. पण अजून मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. न्यायालयाने दाऊदशी संबंध असल्याच्या दाव्यात तथ्य असल्याचं म्हटल्यानंतरही नवाब मलिकांचा राजीनामा उद्धव ठाकरे घेणार नसतील, तर महाराष्ट्राची इतर कोणत्या राज्याशी तुलना करणं ही त्या राज्यावर अन्याय होईल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“पवार बोले, शिवसेना चाले”

दरम्यान, यावेळी टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांच्या वारशाचा देखील दाखला दिला. “कुणीतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, तर त्यावर तातडीने १५-१६ जिल्ह्यात केसेस दाखल होतात. अटक होते. जामीन मिळू दिला जात नाही. मग ज्यांचा हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी संबंध असल्याचं न्यायालयाने म्हटल्यानंतरही राजीनामा घेणार नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवारांशी प्रेरित शिवसेना आहे. पवार बोले, शिवसेना चाले अशी सध्या स्थिती आली आहे.

“खुर्चीसाठी किती तडजोडी करणार?”

“केवळ आपल्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी बंड करून उठा. महाराष्ट्राची काही अस्मिता आहे. बाळासाहेबांचा वारसा शिल्लक ठेवायचा आहे की नाही? की ते संग्रहालयात ठेवायचे आहेत?” असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.