त्रिपुरामध्ये मशीद पाडल्याच्या कथिक घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी बंद पाळण्यात आले. ही मशीद वास्तवात पाडली गेली नसून खोटे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्रिपुरातल्या कथित घटनेवर राज्यात मोर्चे, बंद करणं यामागे भाजपा असल्याचा आरोप संजय राऊतांनी औरंगाबादमध्ये बोलताना केला होता. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

“संजय राऊतांच्या वक्तव्याची कीव येते”

संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची आपल्याला कीव येत असल्याचं चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. “त्रिपुरातील घटनेचे पडसाद म्हणून मालेगावात दंगली होण्यापेक्षा दुर्दैवी संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य आहे. मला खूप कीव येते, वाईट वाटतं. राजकारणासाठी आपण किती लाचार झालो आहोत. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत पाहिजे होते. त्यांनी एक थोबाडीत दिली असती”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“उठता-झोपता तुम्हाला भाजपाच दिसतो”

ज्या समाजकंटकांनी हा प्रकार घडवून आणला, त्यांच्यावर टीका करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे. “तुम्ही राज्य करा, कोण नाही म्हणतंय. मुसलमानांची मतं मिळवा. मी म्हणतोच, की ९५ टक्के मुसलमान देशप्रेमी आहेत. या भूमीला तो आपली भूमी मानतो. पण त्रिपुरात मशीद तोडली तर तिथे काहीतरी करा. पण ५ टक्के मुस्लिमांपैकी काहींनी त्यावरून मालेगाव, अमरावतीत गोंधळ घातला. तुम्ही त्यांच्यावर टीका करा ना. यामुळे ९५ टक्के मुस्लीम तुम्हाला मतं देणार नाही असं नाहीये. ५ टक्के मुसलमान धार्मिक चिथावणीला बळी पडून हे करतो. त्याच्यावर तुम्ही टीकाही करणार नाही? प्रत्येक विषयात झोपताना उठताना तुम्हाला भाजपाच दिसतोय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विरोधी पक्षातील लोकांनी दंगली घडवण्याचं ठरवलं होतं आणि …”, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

“मतदारांनी इंदिरा गांधींनाही घरी पाठवलंय”

लोकशाहीची व्याख्या काय? आम्हाला प्रत्येकाला निवडून येता येणार नाही, लोकप्रतिनिधी होता येणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊन ते काँट्रॅक्ट देतो की आमच्या वतीने तुम्ही जाऊन काम करा. ती अपेक्षा तुम्ही पूर्ण नाही केली, तर इंदिरा गांधींना देखील लोकांनी परत पाठवलं आहे. या देशात शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललंय. पण अशिक्षित देश असतानाही लोकांना कळलं की इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी आणली. १० लाख लोकांचे जेलमध्ये घातलं हे सामान्य माणसाला कळलं. त्याने इंदिरा गांधींना घरी पाठवलं. त्यामुळे कुणीही मिजास बाळगण्याचं कारण नाही की आम्हाला कोण हात लावतंय. भल्याभल्यांना जनता घरी पाठवते”, असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी केलेल्या भाषणात म्हणाले.