scorecardresearch

“ज्या ज्या मंत्र्यांना अटक होईल, त्यांना…”, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा!

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

chandrakant patil on nawab malik arrest

जवळपास ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांकडून या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक शब्दांमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, आता नवाब मलिक यांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी ५ वाजता ईडीनं छापा टाकला. सकाळी ७ वाजता नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. तब्बल ८ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचं जाहीर झालं.

“हे सरकार आंदोलन केल्याशिवाय काही करत नाही”

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंसारख्या परखड नेतृत्वाची परंपरा असणारे आहेत. ते तातडीने हा निर्णय घेतील. अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. प्रत्येक गोष्ट हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावेळीही हेच झालं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळींवर आत्तापर्यंत झालेल्या आरोपांची यादीच माध्यमांसमोर ठेवली. “कशाची वाट पाहाता आहात? एक मंत्री तुमचे एका मुलीने आत्महत्या करण्याच्या प्रकरणात पायउतार झाले. एक मंत्री जेलमध्ये आहेत. ते राज्याचे गृहमंत्री होते. तुमचे मुंबईचे आयुक्त काही काळ परागंदा होते. त्यानंतर आता त्यांच्यावर केसेस सुरू आहेत. सचिन वाझे जेलमध्ये आहेत. एक मंत्री ईडीची नोटीस आली, त्याला अजून हजर होत नाहीत. ईडीला त्यांना सक्तीने हजर करावं लागेल. एका मंत्र्याचं अलिबागमधील १०० कोटींचं रिसॉर्ट तोडण्याची ऑर्डर काढावी लागली. एका नेत्याचा बंगला तोडणार होते, तर त्यांनी स्वत:च तोडला. औरंगाबादच्या एका मंत्र्याच्या मुलावर जमीन लुबाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. एका मंत्र्याच्या दोन बायका आहेत जे हिंदू कोडमध्ये, निवडणूक कायद्यात बसत नाही. ही यादी वाचताना मला दम लागला. यानंतरही तुम्हाला असं वाटत नाही की हे कोलमडत चाललंय?” असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

“महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका…”, नवाब मलिकांच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया!

“ज्या ज्या मंत्र्यांवर असे आरोप होऊन अटक होईल, त्या प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल. या राज्याची तशी परंपरा आहे. नवाब मलिकांना सरते शेवटी ईडीनं अटक केली आहे. आता नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायला हवा. ही नैतिकता आहे. दोन मुख्यमंत्री अशाच प्रकारे पायउतार झाले”, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp chandrakant patil targets nawab malik arrest cm uddhav thackeray ed inquiry pmw

ताज्या बातम्या