पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका घोषित झाल्यापासून सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात निवडणूक होत नसली तरी गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीवरुन राज्यातही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गोवा व उत्तर प्रदेशात निवडणूक लढत असल्याने भाजपा नेत्यांसोबत शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. गोव्यात दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला तिकीट देण्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर निवडणुकीला उभे राहिल्यास कोणीही त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असं सांगत पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. उत्पल पर्रीकर यांना पाठिंब्याची चर्चा करण्यापेक्षा हिंमत असेल तर संजय राऊत यांनी स्वत: गोवा विधानसभा निवडणुकीला उभे राहावे, असं आव्हान त्यांनी दिलं.

“संजय राऊतांचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? ”; उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

दरम्यान यावरुन संजय राऊत यांनी ट्वीट करत उत्तर दिलं. “सगळीच येड्यांची जत्रा… कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत मध्ये नाव असणं गरजेचं असतं, एवढं भाजपा नेत्यांना माहिती नाही, याचं आश्चर्य वाटतं,” असं ते म्हणाले. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

दरम्यान त्यांनी दिलेल्या या उत्तरावरुन चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत विचारलं की, “संजय राऊत यांचं नाव महाराष्ट्राच्या यादीत आहे, पण महाराष्ट्रातही त्यांची निवडणुक लढवण्याची हिंमत कधी झाली?”.

“कोणत्याच पक्षाने उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवार देऊ नये;” संजय राऊतांचं राजकीय पक्षांना आवाहन

“माझ्या वक्तव्यातील व्यंग कळू नये,हे तुमच्यासारख्या पत्रकारासाठी मोठं दुर्दैव आहे. पण असो इतर राज्यांतील उमेदवारांचे डिपॉझिट जमा होईल या तणावात होत असेल कदाचित. लवकर बरे व्हा!,” असंही उपहासात्मकपणे ते म्हणाले.

“मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत”

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केलं जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितल्यानंतर भाजपाची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावंच लागेल”.

“मी कोणतंही राजकीय भाष्य करत नाही. पण मनोहर पर्रीकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान आहे. आज गोव्यात जी भाजपा दिसत आहे त्यात मनोहर पर्रिकर यांचंच योगदान आहे. आजही गोव्यात भाजपा त्यांच्या नावाने ओळखली जाते आणि त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे. गोव्यात, राजकारणात पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत हे चांगलं वाटलं नाही,” असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

“त्यांना तिकीट देणं, न देणं ही पुढील गोष्ट आहे. पण उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिलं जात आहे. उत्पल पर्रिकर यांचं ट्वीट मी पाहिलं आहे. तिथे कोणाला तिकीट देत आहात त्यावर चर्चा करा, त्यानंतर पाहू,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

“भाजपाने उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला आहे? ते कोण सांगणार. जे बोलत आहेत त्यांच्या हातात असतं तर त्यांनी कधीच तिकीटासंबंधी निर्णय घेतला असता. हे फक्त बोलघेवडे आहेत. उत्पल पर्रिकरांचं तिकीट का थांबवलं आहे हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत पडण्याचं कारण नाही. जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील तर मनोहर पर्रीकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये इतकंच आमचं म्हणणं आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

“महाराष्ट्रातही अनेकदा असं घडतं. एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाविषयी सहानुभूती असते. एखादी व्यक्ती निवडणुकीला उभं राहिल्यास आपण लढणार नाही म्हणून सांगतो. गोव्यात ही परंपरा नसली तरी मी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil tweet shivsena sanjay raut goa assembly election utpal parrikar sgy
First published on: 18-01-2022 at 11:51 IST