“काही वजनदार मंत्री त्यांच्या जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा जादा साठा नेत आहेत”, बावनकुळेंचा गंभीर आरोप!

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

chandrashekhar bawankule on remdesivir supply in maharashtra

करोना रुग्णांवर उपचार करताना लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन या दोन्ही गोष्टींचा महाराष्ट्रात तुटवडा निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या अनेक भागांमधून ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव गेल्याचे देखील आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे विदर्भातील नेते आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “महाराष्ट्र सरकारमधले वजनदार मंत्री आपापल्या जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचं दुप्पट-तिप्पट वाटप करत आहेत. आणि विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय सुरू आहे”, असं बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपत सुरू होण्याची शक्यता आहे.

नुकतीच गोंदियामध्ये १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे १५ रुग्ण ऑक्सिजनअभावीच मृत्यूमुखी पडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राज्यात राजकीय वातावरण देखील तापू लागलं आहे. एका खासगी वाहिनीशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत.

“…म्हणून मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करायला हवा”, मुंबईच्या महापौरांनी मांडली भूमिका!

ठाण्यात एका रुग्णाला २ इंजेक्शन!

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी राज्य सरकारमधील काही नेत्यांवर प्रत्यक्ष नाव न घेता टीका केली. “ठाण्यात काल जिल्हाधिकाऱ्यांनी एका रुग्णाला दोन रेमडेसिवीर इंजेक्शन दिले. त्याचवेळी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन पेशंटला एक इंजेक्शन देण्याची ऑर्डर काढली आहे. मला कळलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने २५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात नेले आहेत. मराठवाड्यातल्या एका वजनदार नेत्याने आपल्या जिल्ह्यात १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन नेले आहेत. ऑक्सिजनचे टँकर आणि रेमडेसिवीर इंजेक्शन चार चार पट नेले आहेत. विदर्भात मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्ण मरत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांवर जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे अन्याय करत आहेत”, असा आरोप त्यांनी केला आहे.

केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू; नवाब मलिक यांचा इशारा

“नितीन राऊतांनी वजन वापरावं!”

दरम्यान, यावेळी बावनकुळेंनी राज्याचे ऊर्जामंत्री आणि विदर्भातील नेते नितीन राऊत यांना राज्य सरकारमध्ये आपलं वजन वापरण्याचा सल्ला दिला आहे. “नितीन राऊत साहेबांना माझी विनंती आहे की इतर मंत्री जसे सरकारवर वजन वापरून तिप्पट स्टॉक नेत आहेत, त्याप्रमाणे त्यांनी देखील आपलं वजन वापरावं आणि विदर्भाला होणारा रेमडेसिवीरचा पुरवठा ठाण्याच्या बरोबरीत आणावा”, असं ते म्हणाले.

“विदर्भ आणि गोंदियात जिथे रुग्णाला ४ लिटर ऑक्सिजनची गरज आहे, तिथे २ लिटर दिला जातोय. डॉक्टरांनी पेशंट वाचवण्यासाठी ऑक्सिजनची मात्रा कमी केली आहे. गोंदियात १५ पेशंट फक्त ऑक्सिजन नसल्यामुळे मरण पावले आहेत”, असा दावा त्यांनी बोलताना केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp chandrashekhar bawankule allegations on oxygen shortage remdesivir shortage pmw

ताज्या बातम्या