मराठा आरक्षण: “मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितला पण…,” संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत

राज्य सरकारने केलेल्या घोषणा अपुऱ्या, संभाजीराजेचं परखड मत

मराठा आरक्षणावर खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या घोषणा अपुऱ्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने मोठ्या मनाने आर्थिक मदत वाढवून दिली पाहिजे असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे, मात्र अद्यापही त्यांनी वेळ दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.

“मंत्रीमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी नऊ निर्णय घेण्यात आले त्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन आहे. पण मी पूर्णपणे समाधानी नाही हे परखडपणे मांडायचं आहे. सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळ यांच्यासाठी मदत जाहीर केली असली तरी मला आकडे काही पटलेले नाहीत. ३२ टक्के मराठा समाजासाठी १३० कोटी अपुरे आहेत. किमान १००० कोटी तरी द्यायला हवेत,” अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

आणखी वाचा- मोठ्या मराठा नेत्यांना वाटतं की समाजाला कधी आरक्षण मिळू नये; चंद्रकांत पाटलांचा दावा

पुढे ते म्हणाले की, “करोना महामारी समजू शकतो पण मराठा समाजाला काही ठोस द्यायचं असेल, सारथीला आपल्या पायावर उभं करायचं असेल तर इतक्या कमी पैशात काही होणार नाही”. मराठा आरक्षणावर सगळ्यांनी एकत्र बसून एक धोरण तयार करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे.

आणखी वाचा- मराठा नेत्यांनी आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये – प्रकाश आंबेडकर

“हा कोणत्या एका पक्षाचा अजेंडा नाही हे माझं प्रामाणिक मत आहे. सगळ्या पक्षातील खासदार यावेत असं मला वाटतं. पंतप्रधानांच्या भेटीसाठी भाजपासोबत शिवसेना, राष्ट्रवादी यांनीही पुढाकार घेतला असून आनंदाची बाब आहे. शरद पवारांनी पंतप्रधानांची वेळ मिळेल तेव्हा आमचे सर्व खासदार येतील असं सांगितलं असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांनीही खासदार येतील असं म्हटलं आहे. अजून वेळ मिळालेली नाही. करोनामुळे कदाचित पंतप्रधान भेटत नसतील. पण मराठा समाजातर्फे पंतप्रधानांनी आमचं म्हणणं ऐकावं अशी विनंती केली आहे,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp chhatrapati sambhajiraje bhosale maratha reservation pm narendra modi maharashtra government sgy

ताज्या बातम्या