सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा आपसूक केंद्र सरकारबद्दलचा द्वेष सहाजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपले पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावे लागत आहे अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. “गेल्या दोन वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’ चे धोरणे स्वीकारले असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

“शिवसेनेचं नेमकं धोरण काय आहे ते जनतेला माहिती झालं आहे. औरंगाबादचं नाव संभाजी नगर करणारच येथून यांची सुरुवात झाली. करोनामध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना ५० लाख देणार, एमपीएससीच्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार, टाळेबंदीच्या काळातील वीजबिलं माफ करणार,” अशी यादीच वाचून दाखवत चित्रा वाघ यांनी फटे लेकिन हटे नाही असा टोला लगावला.

“जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचे कृत्य केलं. खरोखरच शिवसेनेची फटे लेकीन हटे नही’ची वृत्ती खूपच कौतुकास्पद आहे आणि त्याचा सार्थ अभिमान दिल्लीच्या युवराजांना झाला असेल म्हणूनच त्यांनी आपल्याला पाठीवर कौतुकाची थाप दिली,” असा टोला चित्रा वाघ यांना संजय राऊत यांना लगावला.