“हिंमत दाखवा, आमच्याशी लढा”, अशा शब्दांत शिवसेनेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यामाधील कार्यक्रमामधून थेट आव्हान दिलं. या आव्हानाला शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शाह यांनी केलेल्या टीकेनंतर पक्षाची भूमिका मांडताना राऊत यांनी भाजपाला थेट लढाई लढावी असं आव्हान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने वचन मोडले. मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले. ज्यांच्याबरोबर दोन पिढ्या वाद घातला त्यांच्या मांडीवर जाऊन शिवसेना बसली, अशा शब्दांत शहा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. यावरून प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार तीन चिलखतं घालून लढत असल्याचा टोला लगावला.

“महाराष्ट्रात सरकार उत्तम चालले आहे. केंद्राने प्रयत्न करुनसुद्धा सरकारचा एक कवचासुद्धा उडालेला नाही याचं दुखः आम्ही समजू शकतो. मी सांगतो सीबीआय, एनसीबी आणि ईडीची चिलखते घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरत आहात. हे दूर करा आणि आमच्यासोबत लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत पाठीमागून प्रतिहल्ले करत नाही. समोर लढायचे आम्हाला शिकवू नका,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

२०१४ साली शिवसेनेला दूर करा असे भाजपाच्या नेत्यांना सांगणारे कोण होते हे अमित शाहांनी स्पष्ट करावे- संजय राऊत

त्यावर आता भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी राज्याला लुटण्यासाठी आणि चौकशीपासून पळवाट काढण्यासाठी सत्तेचा वापर चिलखतासारखा केला असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले.

“गृहमंत्र्यांना देशात काम नसेल तर आम्हाला सांगा”; अमित शाहांच्या टीकेनंतर संजय राऊतांचे प्रत्युत्तर

“ईडी, सीबीआयचा वापर चिलखतासारखा केल्याचं सर्वज्ञानी संजय राऊत म्हणताहेत. खरंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी सत्तेचा वापर चिलखतासारखा केलाय. राज्याला लुटण्यासाठी. चौकशीपासून पळवाट काढण्यासाठी. खुद्द संजय राऊतांनी ५५ बॅंक घोटाळ्यात ५५ लाख रुपये परत केले. चिलखत उतरले नाही तर वस्त्रहरण झालंय,” अशी टीका चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

काय म्हणाले होते अमित शाह?

मी खोटे बोललो होतो, असे काही क्षण गृहीत धरले तर प्रत्येक भाषणात मोदींचे नाव का घेण्यात येते होते, जाहिरात फलकांवर मोदींचे छायाचित्र किती मोठे लावण्यात आले होते, हे आठवावे. मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून विश्वासघात करण्यात आला, असा आरोपही शहा यांनी केला. सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे शिवसेनेला वाटत आहे, असा टोलाही शाह यांनी लगावला होता. तसेच शिवसेनेनं भाजपाशी थेट दोन हात करावेत असं आव्हानच शाह यांनी आपल्या भाषणामधून दिलं.