करोनाच्या काळात भाजपाने देशात हत्याकांड घडवण्याचं काम केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. ऑक्सिजन पुरवठ्यावरही केंद्राचं लक्ष नव्हत त्यामुळे करोनाकाळात मृत्यूचं पाप भाजपाने केल्याचा घणाघात नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.

“जेव्हा करोना आपल्या देशात येत होता तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सूचना करुनही आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये व्यग्र असल्याचे आपण पाहिले. लस आपल्याकडे उपलब्ध होती ती पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यवस्थेसाठी हेच जबाबदार आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन इत्यादीचा कसा पुरवठा केला तेही आपण पाहिले. भाजपाने करोनाच्या काळात देशामध्ये एकप्रकारे हत्याकांड घडवण्याचं पाप केलं, असं आमचं म्हणणं आहे,” असे नाना पटोले यांनी म्हटले.

देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले होते. करोना फैलावास केवळ आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाला फटकारले होते.

मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात अशा शब्दांत फटकारलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली होती.