अलिबाग – अलिबाग विधानसभा मतदार संघाबरोबरच महाडमध्ये भरत गोगावले, कर्जत मध्ये महेंद्र थोरवे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या परिस्थितीत रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकण्यात कुठलीच अडचण येईल असे वाटत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कुणा पक्षाला सोबत घ्यायची गरज वाटत नाही असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सध्या अलिबागमध्ये मतदार संघ वार आढावा बैठका आयोजित केल्या आहेत. रविवारी संध्याकाळी आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघाची आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार दळवी बोलत होते.
राजा केणी यांनी या मतदार संघात कामाचे सातत्य ठेवले आहे. यामुळे इथं शिवसेनेचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत वाढत आहे. एकेकाळी हा मतदार संघ शेकापचा बालेकिल्ला होता परंतु आता तो राजाचा गड झाला आहे. या मतदार संघातून रसिका केणी निवडणूक लढवणार असून त्या नक्की विजयी होतील , असा विश्वास महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. इथल्या नेत्यांनी सातत्याने येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी उद्योग विरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेकाप मधून भाजप मध्ये गेलेली मंडळी इथून निवडणूक लढवू पहात आहेत परंतु जे स्वतःच्या मामाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संभाव्य उमेदवार रसिका केणी यांनीही विरोधकांचा समाचार घेतला. कामे मंजूर करून घ्यायची, मात्र ती न करता खोटी बिलं काढायची हा इथल्या नेत्यांचा फंडा होता. पण आधी काम आणि नंतर नारळ फोडायचा राजा केणी यांचा पॅटर्न इथं यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकांना दूर ठेवा असं आवाहन त्यांनी केलं.
ज्येष्ठ नेते दिलीप भोईर यांनीही यावेळी केलेल्या भाषणात शेकाप, भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली. विधानसभेला मी आणि महेंद्र दळवी एकमेकांच्या विरोधात लढलो आता एकत्र आल्याने शिवसेनेची ताकद वाढली असून त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघातून रसिका केणी, कुर्डुस पंचायत समिती मधून कृष्णा भोपी, आंबेपूर पंचायत समितीसाठी शैलेश पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
या मेळाव्याला कामगार नेते दीपक रानवडे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक संजीवनी नाईक , तालुका संघटक जीवन पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉन कोण ते दाखवून देऊ
मुरुड महोत्सवात खासदार सुनील तटकरे यांनी मैं हुं डॉन या गाण्यावर केलेल्या डान्सवरून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार टोलेबाजी केली. रायगड जिल्ह्यात आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे कुणी मैं हुं डॉन म्हणत असेल तर त्याला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर उत्तर देऊ असं दळवी हे सुनील तटकरे यांना उद्देशून म्हणाले. आपली निवडणूक झाली की तटकरे गियर बदलतात आणि कधी तरी म्हणतात मैं हुं डॉन पण मी सुद्धा त्यांच्यावरचा डॉन आहे, वेळ येईल तेंव्हा नक्की दाखवून देऊ , असा इशाराही आमदार दळवी यांनी दिला.
