BJP Congress AIMIM alliance in Hiwarkhed: अकोट नगरपरिषद निवडणूक निकालानंतर तिथे झालेल्या भाजपा आणि ‘एमआयएम’च्या युतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये भाजपाने काँग्रेससोबत केलेली जवळीकही चांगलीच चर्चेत आली होती. आता अशीच काही परिस्थिती आणखी एका नगरपरिषदेत झाली आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत भाजपाने आणखी एक धक्का दिला आहे. तिथे भाजपाने चक्क काँग्रेस आणि ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) सोबत हातमिळवणी केली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे.

“आश्चर्यच! हिवरखेडमध्ये ‘महायुती’ की ‘महाखिचडी’?”, सोशल मीडियावर अशा मथळ्याची पोस्ट करत दानवे यांनी हिवरखेडमध्ये भाजपा, काँग्रेस आणि एमआयएम कशी एकत्र आली आहे हे सांगितले. पहिल्यांदाच नगरपरिषद झालेल्या हिवरखेडमध्ये विरोधी विचारांचे पक्ष एकत्र येताना दिसत आहे. येथील नगरपरिषदेच्या बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये अनिता वाकाडे ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत त्यांच्या नामनिर्देशित अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविकेचे (रुबिजा सलमान) नाव आहे. तर अनुमोदक म्हणून ‘एमआयएम’च्या (आजम खान) यांचे नाव आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

हिवरखेड नगरपरिषदेत दुर्मिळ योग जुळून आला आहे. भाजपच्या ‘लग्नाला’ काँग्रेस आणि एमआयएम वाजंत्री म्हणून हजर आहेत, असं म्हणत दानवे यांनी तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. तसेच या युतीची महाराष्ट्रातील एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते इम्तियाज जलील आणि भाजपाला आठवणही दानवे यांनी करून दिली आहे.

नेमकी पोस्ट काय?

“आश्चर्यच! हिवरखेडमध्ये ‘महायुती’ की ‘महाखिचडी’?
भाजप उमेदवार: अनिता वाकोडे
सूचक: काँग्रेस (रुबिजा सलमान)
अनुमोदक: एमआयएम (आजम खान)

हिवरखेड नगरपरिषदेत दुर्मिळ योग जुळून आलाय. भाजपच्या ‘लग्नाला’ काँग्रेस आणि एमआयएम वाजंत्री म्हणून हजर आहेत. ऑल द बेस्ट!” अशी पोस्ट उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी करत टीका केली आहे.

अंबरनाथ आणि अकोट नगरपालिकेत यशस्वी प्रयोग

यापूर्वी अंबरनाथ नगरपालिकेतही भाजपाने असाच प्रयोग केला होता. तिथे मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) खो देऊन काँग्रेससोबत युती केली होती. येथे भाजपाने काँग्रेससोबत युती केली होती. या युतीनंतर शिवसेनेने (शिंदे गट) नाराजीही दर्शविली होती. अंबरनाथप्रमाणेच अकोट नगरपालिकेतही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला मोठी खेळी खेळावी लागली होती. विचारधारेशी फारकत घेऊन भाजपाच्या स्थानिक नेतृत्त्वाने एमआयएमसोबत युती केली होती.