तिन्ही प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील!

सहकारपट्टय़ातील विधानसभेच्या ५८ जागांसाठी दोन्ही आघाडय़ांमध्ये चुरस

सहकारपट्टय़ातील विधानसभेच्या ५८ जागांसाठी दोन्ही आघाडय़ांमध्ये चुरस

मुंबई : काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही मुख्य पक्षांचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील झाले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाची मदार पश्चिम महाराष्ट्रावर असून, या दृष्टीने साऱ्यांनीच नियोजन सुरू केले आहे.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे सांगली, बाळासाहेब थोरात हे नगर तर चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्य़ातील आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील या तिन्ही नेत्यांकडे आपापल्या पक्षांना यश मिळवून देण्याची जबाबदारी आली आहे. जयंत पाटील हे मे २०१८ पासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आहेत. थोरात आणि चंद्रकांत पाटील यांची नुकतीच प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. विदर्भातील ६२ जागांच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा असल्याने या विभागात जास्तीत जास्त यश मिळविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न दिसतो.

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांसाठी पश्चिम महाराष्ट्र हा विभाग महत्त्वाचा आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व होते. पण २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून हळूहळू भाजपने पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरायला लागले. कोल्हापूर, सांगली, नगर जिल्ह्य़ांमध्ये भाजपने राष्ट्रवादीला शह दिला. सहकारातील राष्ट्रवादीच्या मक्तेदारीला आव्हान दिले. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सांगलीचा बुरूज ढासळला. यंदा लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा उमेदवारही रिंगणात नव्हता. राष्ट्रवादीला सत्ता मिळाली ती पश्चिम महाराष्ट्रामुळेच. भाजपने राष्ट्रवादीचे आव्हान मोडून काढले.

भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, नगर, शिर्डी, सोलापूर, माढा, पुणे, मावळ या जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने बारामती, सातारा या जागा कायम राखताना शिरुरची जागा जिंकली. विधानसभेतही जास्तीत जास्त जागाजिंकण्यावर भाजपने भर दिला आहे.

जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी अधिक ताकदवान असल्याने भाजपने राष्ट्रवादीवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मोहिते-पाटील, विखे-पाटील ही दोन मोठी घराणी फोडून भाजपने सोलापूर आणि नगरमध्ये बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात भाजपचे कमळ फुलविण्याचे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील दोन्ही जागा शिवसेनेने जिंकल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरमध्ये चंद्रकांतदादांची कस लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp congress ncp maharashtra president from western maharashtra zws