महाड येथील चवदार तळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. यामुळे राज्यभर भाजपाकडून आव्हाडांचा निषेध केला जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आव्हाडांविरोधात आंदोलन केलं. त्याचबरोबर पुण्यातील एका पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. भाजपाकडून आव्हाडांवर टीका होत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ हे आव्हाडांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. तसेच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करू पाहणाऱ्या शिक्षण विभागावर आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांवर टीका केली आहे.

शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे दोन श्लोक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबाबत सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. त्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम राबवला. परंतु, यावेळी मनुसमृतीची प्रत फाडत असताना त्यांच्या हातून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला कागद फाटला. चवदार तळे परिसरातील गोंधळ, कार्यकर्त्यांची गर्दी आणि मनुस्मृतीविरोधातील रागाच्या भरात गडबडीत त्यांच्याकडून ही चूक झाली. याबाबत त्यांनी त्याच ठिकाणी माफीदेखील मागितली. मात्र या घटनेमुळे आव्हाडांवर टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेत्यांनी आव्हाडांवर टीका केली.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडली आहे. भुजबळ म्हणाले, “जितेंद्र आव्हाड हे खूप चांगल्या भावनेने तिथे गेले होते. तिथे त्यांच्या हातून चुकून काहीतरी झालं. तो कागद फाडताना त्यांनी त्यावर कोणाचा फोटो आहे ते पाहिलं नव्हतं. त्याप्रकरणी त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली आहे. त्यामुळे आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. ते विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. मुळ मुद्द्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आमचं म्हणणं इतकंच आहे की, आपल्या शालेय शिक्षणात ममुस्मृतीचा चंचूप्रवेश नको.”

आव्हाडांकडून भुजबळांचे आभार

भुजबळांनी पाठराखण केल्यानंतर आव्हाड यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे.”

महाविकास आघाडीकडून आव्हाडांची पाठराखण

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर टीका होत असताना त्यांच्या पक्षातील आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांनीदेखील त्यांची बाजू घेतली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील आव्हाड यांची बाजू मांडली आहे. जयंत पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली ३५ हून अधिक वर्षे सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांवरील निष्ठा आणि प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही. आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे.

हे ही वाचा >>“अजित पवारांचं आव्हान स्वीकारते, पण एक अट…”, अंजली दमानियांचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या, “तुमचे विशाल अग्रवालशी…”

मविआतील नेत्यांच्या पाठिंब्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, याची मला खूप गरज वाटत होती. आत्ता मला एकटं वाटणार नाही. अनावधानाने चूक झाली ताबडतोब माफी मागितली. पण मनूवादी आता मनूला माझ्यामागे लपवत आहेत ते मी होऊ देणार नाही.