Latur Mahapalika Election Result 2026 : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसवून टाकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाची लातूरमध्ये मोठी पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीने ४७ जागांसह बहुमताचा आकडा पार केला आहे; तर भारतीय जनता पक्षाला केवळ २२ जागांवरच आघाडी मिळाली आहे. त्याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. शिंदे गटाला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचाच महापौर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्यावेळी लातूर महापालिका निवडणुकीत भाजपाने विजय मिळवून काँग्रेसला पराभवाचा धक्का दिला होता.

यंदा महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू असताना भाजपाचे प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण यांनी लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती; तर विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी चव्हाण यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय लातूरमधील अनेक जुन्या जाणत्या राजकारण्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.

आणखी वाचा : देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव; अमरावतीत भाजपाला मोठा धक्का!

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने लातूर महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. गुरुवारी (१४ जानेवारी) महापालिकेच्या एकूण ७० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा महापालिकेत जवळपास ७० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून समोर आले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत होती. भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती केली. यावेळी सर्व पक्षांचे मिळून एकून ३६९ उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा : मुंबईत कोणाला आघाडी? मजमोजणीचे सुरुवातीचे कल हाती; आकडेवारी काय सांगते?

शुक्रवारी सकाळी १० वाजता महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने सुरुवातीच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली होती. परंतु दुपारनंतर महापालिकेचे चित्र पालटताना दिसून आले. काँग्रेस व वंचित बहुजन पक्षाच्या युतीने मोठी मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला. मतमोजणीचे शेवटचे कल हाती आले तेव्हा लातूरमध्ये काँग्रेसच्या आघाडीने ४७ जागांवर आघाडी घेतली होती; तर भाजपाचे केवळ २२ जागांवरील उमेदवार आघाडीवर होते. त्याशिवाय अजित पवार यांच्या पक्ष एका जागेवर आघाडीवर होता. विशेष बाब म्हणजे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या महापालिकेत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे जवळपास झाले आहे.