लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला वाढते मताधिक्य मिळाल्याने महायुतीमध्ये नगर शहरातील शिवसेनेकडे असलेली जागा भाजपला मिळावी, पक्ष येथील जागा लढवण्यासाठी सक्षम आहे, अशी मागणी प्रदेश शाखेकडे करण्याचा निर्णय काल रात्री पक्षाच्या शहर जिल्हा जिल्हा पदाधिका-यांच्या बैठकीत करण्यात आला. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी लवकरात लवकर नियुक्ती करावी व त्यासाठी नगर शहरातील कार्यकर्त्यांस प्राधान्य द्यावे, अशीही मागणी प्रदेशकडे केली जाणार आहे.
पक्षाचे उमेदवार खा. दिलीप गांधी यांच्या विजयाच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी खा. गांधी यांचा सत्कार केला. या वेळी सुनील रामदासी, अनंत जोशी, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, सुरेखा विद्ये, चेतन जग्गी, प्रशांत मुथा, दामोदर बठेजा, किशोर बोरा, अंकुश गोळे, कालिंदी केसकर, नगरसेवक श्रीपाद छिंदम, मालन ढोणे, मनीषा काळे, उषा नलावडे, महेश तवले आदी उपस्थित होते.
नगर शहरातून आपल्याला चांगले मताधिक्य मिळाल्याने आपण दर पंधरा दिवसांनी कार्यकर्त्यांसाठी पक्ष कार्यालयात उपलब्ध राहु, शहराला अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन गांधी यांनी दिले. शहरातील ज्या बूथवर मताधिक्य अधिक आहे, तेथील बूथ समित्यांचा गौरव करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या व्यापारी आघाडीचे प्रतिनिधी महावीर कांकरिया यांनी पक्षाने एलबीटीच्या विषयावर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शहरातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार ही मागणी प्रदेश शाखेकडे करण्याचे ठरले. नगरसेवक सुवेंद्र गांधी व सेनेचे आमदार अनिल राठोड यांच्यातील वादावर पदाधिका-यांच्या हस्तक्षेपाने चर्चा टाळली गेली.



