scorecardresearch

उद्धव ठाकरेंनी पत्नीला टोला लगावल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले “मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी…”

उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य; देवेंद्र फडणवीसांचं विधान

उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य; देवेंद्र फडणवीसांचं विधान

सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य असल्याचं म्हटलं आहे.

“सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे हे मला समजलेलं नाही. पण, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पाच वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सहा महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही अशी तरतूद आहे. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. दोन वर्ष या सरकारने वेळकाढू धोरण अवलंबलं. ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यामुळेच अशाप्रकारचा निकाल आला,” अशी टीका यावेळी फडणवीसांनी केली.

“कोर्टाने तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही, आम्ही किती दिवस थांबायचं अशी विचारणा केली. कोर्टाने नवीन कायदा रद्द केला नाही. पण, सरकारच्या कार्यपद्धतीवर मात्र तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी होणार आहे. या हानीला सरकारच जबाबदार आहे. योग्य भूमिका महाविकास आघाडी सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कार्यवाही करायला हवी होती, ती सुद्धा केलेली नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘मला वाटलं एकच व्यक्ती गाते’; उद्धव ठाकरेंनी टोला लगावल्यानंतर अमृता फडणवीसांचं उत्तर; म्हणाल्या “अशीच गुणी मंडळी…”

“राणा दांपत्याला जामीन मिळणं साहजिक आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने राजद्रोह लावण्याचा करंटेपणा या सरकारने केला. त्यामुळे असा विषय कोर्टात टिकू शकत नाही,” असं फडणवीसांनी सांगितलं.

“राज्य सरकार जर राणा दांपत्या हनुमान चालीस म्हणतीये या मुद्द्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावून जेलमध्ये टाकू शकतं तर भोंग्याच्या संदर्भातील भूमिका काय असेल याची कल्पना आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन सरकार करत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावी लागेल,” असं फडणवीस मनसेच्या आंदोलनावर बोलताना म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस १८५७ च्या उठावातही सहभागी होते अशी टीका केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी आहेत, त्यांना ना संघर्ष करावा लागला आहे, ना पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते करु शकतात, पण कितीही खिल्ली उडवली तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व आहे. मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित १८५७ च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता ज्यांच्याशी तुम्ही युती केली आहे ते १८५७ ला युद्धच मानत नाहीत”.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीसांवर केलेली टीका आणि त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे . उद्धव ठाकरे टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी बायको नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे, आणि अशा काही गोष्टी आल्या तर माझ्या पत्नीनेही त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadanvis amruta fadanvis maharashtra cm uddhav thackeray sgy

ताज्या बातम्या