करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे

BJP, Devendra Fadanvis, Karuna Sharma Pistol Found
करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर ताब्यात घेण्यात आलं. पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करत असून करुणा शर्मा यांनी मात्र मला फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

परळीमध्ये करुणा शर्मांच्या वाहनात आढळले पिस्तूल!

“यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी जे काही घडलं आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्युत्तर होत आहेत आणि मिळालेलं पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अनिल देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं

“मलादेखील माध्यमांकडूनच ईडीने लूकआऊट नोटीस काढली असल्याची माहिती मिळाली. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने त्यांनी आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरं जावं; तेच योग्य ठरेल,” असा सल्ला यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांना दिला.

मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्र्यांनी काही पक्ष आंदोलन करुन राजकारण करत असल्याची टीका केली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, “समोरच्यांना बोलायच्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना, आपल्या पक्षातील लोकांना पहिलं शिकवावं आणि मग आम्हाला सांगावं”.

सत्तेचे लचके तोडण्यासाठी महाविकास आघाडी

“महाविकास आघाडी सत्तेसाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागत आहे. जितके लचके तोडता येतील तेवढे तोडत असून नाही तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशी अवस्था आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp devendra fadanvis on karuna sharma pistol found in car sgy

ताज्या बातम्या