दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत आहे कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे अशी टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गांधी कुटुंबाकडून बाळासाहेबांसाठी एक ट्वीट करुन दाखवा”; लाचारी म्हणत फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

“सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

‘भाजपची आणीबाणी मोडून काढूया’ उद्धव ठाकरे यांचा घणाघात; देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन

“पण जे निवडक विसरण्याची पद्धत आहे त्यासाठी आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,” अशी आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली.

“हे भाजपासोबत सडले असं सांगातत. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाले. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे,” असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला.

“भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय?”

“मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येत भाषणात तेच मुद्दे आहेत. आता शिवसैनिकांनाही ते काय बोलणार आहेत हे पाठ झालं असेल. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, रामजन्मभूमीसाठी आम्हीच तिथे होतो सांगतात.. कोण होतं तुमचं?; रामजन्मभूमी आंदोलनात लाठ्या, काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत. रामजन्मभूमी, बाबरी हे विषय सोडून द्या. ते तर मोदींनी करुन दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात मंदिर उभं राहत आहे. पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा, श्रीमलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले. कशाला राजनन्मभूमीच्या गप्पा मारता. भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय?,” असा सवाल फडणवीसांनी यावेळी विचारला.

“हिंदुत्व जगावं लागतं, ते फक्त भाषणापुरतं मर्यादित नसतं”

पुढे ते म्हणाले की, “आरएसएस, धर्मवीर आनंद दिघेंनी संघर्ष केला. पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हाही तुम्ही सोडवला नाही आणि आजही तुम्ही सोडवला नाही. त्यामुळे तुमचं हिंदुत्व कागदावरचं, भाषणातलं आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करु शकले नाही, उस्मानाबादचे धाराशीव करु शकले नाही. पण तिथे अलाहाबादचं प्रयागराज झालं, त्यांनी ते करुन दाखवलं. तुम्ही फक्त बोलत राहिलात. हिंदुत्व जगावं लागतं, ते फक्त भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदींनी ते करुन दाखवलं आहे”.

“यापेक्षा मोठी लाचारी काय?”

“आज प्रयागराजमध्ये हिंदूंच्या आस्थेचा कुंभ ज्याप्रकारे आयोजित करण्यात आला आणि त्यासाठी ज्या सोयी केल्या त्या तुम्ही कुठे केल्यात का? ३७० कलम रद्द करताना तुमची दुटप्पी भूमिका होती. कशासाठी हिंदुत्वाच्या गप्पा मारता. आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून करुन दाखवा. याला लाचारी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते. तरी सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसता. यापेक्षा मोठी लाचारी काय?,” अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

“नंबर १ चा पक्ष भाजपाच आहे हे आम्ही दाखवून देऊ”

“हिंदुत्वाच्या गप्पा आणि लाचारीचं बोलणं तुमच्या तोंडी शोभत नाही. संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या हिताचं काही नाही. आम्ही काय दिशा देणार याची माहिती नाही. घोटाळ्यांबद्दल, गृहमंत्री जेलमध्ये आहेत, पालिकेत होणारी लूट, दरोडेखोरी याबद्दल कुठे बोलणार..त्यांना माहिती आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला लागलो तर आपल्याला तोंड नाही. म्हणून मग अशा प्रकारचे विषय आणायचे आणि दोन दिवस वेगळे वाद सुरु राहतील,” असा आरोप फडणवीसांनी केली. “भाजपा पक्ष स्वत:च्या हिंमतीवर आपलं सरकार स्थापन करेल आणि वेगळं लढूनही नंबर १ चा पक्ष भाजपाच आहे हे आम्ही दाखवून देऊ,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

“इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनुभवलं नाही”

बाबरी मशिदीनंतर संपूर्ण देशात शिवसेनेसाठी अनुकूल लाट होती. तेव्हा सीमोल्लंघन केलं असतं तर आज दिल्लीत शिवसेनेचा झेंडा असता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “१९९३ च्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर प्रदेशात १८० उमेदवार लढवले होते. त्यातील १७९ लोकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. १९९६ मध्ये २४ उमेदवार लढले त्यातील २३ जणांचं आणि २०१९ मध्ये ३९ उमेदवार लढवले आणि सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. लोकांनी तुम्हाला नाकारलं होतं, कारण त्यांना रामजन्मभूमीच्या आंदोलनात कारसेवक आणि संघ विचाराचे लोक सक्रीय होते हे माहिती होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निवडक बोलणं बदं करुन महाराष्ट्राच्या प्रशासनावर लक्ष दिलं पाहिजे”.

“महाराष्ट्राची जी अवस्था आज होत आहे ती यापूर्वी कधी पाहिली नाही. इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनुभवलं नाही. चौथ्या क्रमांकावर गेल्याची निराशा असू शकते, पण त्यांनी अशी काढू नये,” असा सल्ला यावेळी फडणवीसांनी दिला.

हे जन्माला येण्याआधीपासून आम्ही हिंदुत्तवादी होतो असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं असून नाय मातीत गाडलं, लोळवलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही असं म्हटलं आहे. त्यावर त्यांनी आत्ताच नाव बदलावं असा टोला लगावला.

“ईडी, सीबीआय बाजूला ठेवण्याचं आव्हान दिल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “चोऱ्या कराल तर ईडी, सीबीआय कारवाई करणारच. तुम्ही तर आम्ही एखादं ट्वीट केलं तरी जेलमध्ये टाकत आहात. राबडी देवी ही काय शिवी आहे? पण सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं म्हणून पुण्याचे २५ पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घऱात जात आहेत. आम्ही त्यांचं समर्थन नाही केलं. त्यामुळे हा रडीचा डाव आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग जितका शिवसेना आणि इतर दोन पक्षांनी सुरु केला आहे त्यावरुन मला महाराष्ट्राताचं राजकारण कुठे चाललंय याची चिंता आहे. सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग महाराष्ट्रात सुरु झाला असून महाराष्ट्राचं राजकारण योग्य दिशेला जाईल असं वाचत नसल्याचं ते म्हणाले. दिल्लीत २०१४ साली भगवा फडकला आहे असा टोलाही यावेळी त्यांनी शिवसेनेला लगावला. नाचता येईना अंगण वाकडे अशी सरकारची अवस्था असल्याचं फडणवीस म्हणाले.

नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. नागपुरात त्यांनी भाजपामधील उमेदवार घेतल्यानंतर त्याची काय अवस्था झाली हे आपण पाहिलं. भंडारा, गोंदियात काय अवस्था झाली हेपण पाहिलं. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मी कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवा अशी विनंती करेन असं फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis on maharashtra cm uddhav thackeray balasaheb thackeray alliance sgy
First published on: 24-01-2022 at 13:11 IST