मंदिरं उघडण्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं असून यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर उघडण्याचा विषय मांडताना उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची करुन दिली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अशा शब्दांत उत्तर दिलं आहे. दरम्यान राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील पत्रव्यवहारावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

“राज्यपालांकडे जी निवेदनं येत असतात, त्यासंबंधी पत्र लिहून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. पण मुख्यमंत्री उद्धव यांनी ज्याप्रकारे पत्र पाठवलं आहे, ते दुर्दैवी आहे,” असं ते म्हणाले आहेत. पुढे त्यांनी सांगितलं की, “शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई लढत असल्याचं सांगतो. पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते”.

“मंदिरांमुळे केवळ भाविकांचीच आभाळ होते असं नाही तर त्याचा छोट्या व्यावसायिकांनाही फटका बसतो. त्यामुळे सरकारला सुबुद्धी मिळो आणि लवकरात लवकर मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा,” असंही ते म्हणाले आहेत. “तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का?,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विचारला आहे.