…अन् पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ टीकेसंबंधी विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले

विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे; पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

BJP, Devendra Fadanvis Press Conference, Pankaja Munde, Bhagvangad
विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे; पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

मी घरात बसले, म्हणून जे खूश आहेत त्यांनी माझा दौरा लिहून घ्यावा. दिल्लीपासून नाशिकपर्यंत आणि डिसेंबरमध्ये उसाच्या फडात जाऊन कामगारांशी संवाद साधणार आहे, असे सांगत हिंदी काव्याचा दाखला देत जगातील सर्व अन्याय सहन करण्याची ताकद आपल्यात असून मी सागरापेक्षा खोल आहे, मग मला कधीपर्यंत रोखणार, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतील योजना जनतेसाठी राबवाव्यात, असे आवाहन करून विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे असा घरचा आहेरही भाजपच्या नेत्यांना दिला. पंकजा मुंडे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

“रोज आमचा एक नेता उठतो आणि सरकार पडणार सांगतो….”, पंकजा मुंडे यांचा भाजपाला घरचा आहेर

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. मात्र पंकजा मुंडे यांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता फडणवीस काही न बोलताच पत्रकार परिषदेतून निघून गेले.

पंकजा मुंडेंनी नेमकं काय म्हटलं –

“मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येक सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

हेही वाचा – बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे – देवेंद्र फडणवीस

फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे?”

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपाला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp devendra fadanvis press conference pankaja munde bhagvangad sgy

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या