मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या दौऱ्याला स्थानिक भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं जाहीर केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं असताना त्यासंदर्भात राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आज नृसिंह मंदिराला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून टोला लगावला. “सहकार्य हवं असल्याचं सांगितलं असतं तर अयोध्येला जाण्यासाठी आम्ही सहकार्य केलं असतं”, असं संजय राऊत म्हणाले होते. यावरून फडणवीसांनी प्रतिटोला लगावला आहे.

“संजय राऊत ही कुणी महत्त्वाची व्यक्ती नाही”

संजय राऊत हे काही महत्त्वाची व्यक्ती नसल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले. “ते सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात. गेले तर कशासाठी गेले, नाही केले तर का नाही गेले? असं विचारतात. त्यामुळे अशा व्यक्तीला मी उत्तरं देत नसतो”, अशा शब्दांत फडणवीसांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

“राज ठाकरेंचं स्वागतच होईल”

“मला वाटतं राज ठाकरेंनी दौरा पुढे ढकलला आहे, रद्द केलेला नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे, की जो रामभक्त अयोध्येला जाईल, त्याचं स्वागतच झालं पाहिजे. त्याला अडवणं चुकीचंच आहे. ते जेव्हाही जातील त्यावेळी त्यांचं स्वागतच होईल”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.