scorecardresearch

यशवंत जाधवांवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही जे म्हटलं होतं…!”

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “दोन वर्ष कोविड होता. पण कोविडच्या नावावर मुंबई महानगर पालिकेला कसं लुटलं जातंय, हा आरोप आम्ही केला होता.”

devendra fadnavis on yashwant jadhav
देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका!

शिवसेना नेते आणि मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यानंतर आता त्यांची चौकशी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये २ कोटी रुपये ‘मातोश्री’ला दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात प्राप्तीकर विभाग अधिक तपास करत असून त्यावरून आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत जाधव यांच्या प्रकरणार प्रतिक्रिया दिली आहे.

२४ महिन्यांत ३८ मालमत्ता?

देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुंबईतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख केला. “त्यांनी सभागृहातच सांगितलं की २४ महिन्यांत ३८ मालमत्ता त्यांनी खरेदी केल्या आहेत. दोन वर्ष कोविड होता. पण कोविडच्या नावावर मुंबई महानगर पालिकेला कसं लुटलं जातंय, हा आरोप आम्ही केला होता. आम्ही जे म्हटलं होतं ते आता खरं ठरत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘मातोश्री’ म्हणजे नेमकं कोण?

यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये ‘२ कोटी आणि भेटवस्तू मातोश्रीला दिले’ असल्याची नोंद असल्याचं प्राप्तीकर विभागाच्या तपासात समोर आल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तात दिली आहे. मात्र, मातोश्री म्हणजे हे पैसे आपल्या आईला दिल्याचं यशवंत जाधव यांनी जबाबात म्हटल्याचं देखील या वृत्तात नमूद केलं आहे. यावरून आता राज्यात नव्याने राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या; आयकर विभागाला आढळल्या नोंदी

महिन्याभरापूर्वी प्राप्तीकर विभागाचे छापे

साधारण महिन्याभरापूर्वी प्राप्तीकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबईतल्या एकूण ३३ ठिकाणी विभागानं शोध घेतल्याचं देखील सांगितलं गेलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadnavis targets yashwant jadhav on income tax raid pmw