भाजपच्या महानगर आणि जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आनंदसागर मंगल कार्यालयात शनिवारी दोन वेगवेगळ्या सत्रांत होणार असल्याची घोषणा काळजीवाहू महानगराध्यक्षांनी गुरुवारी केली. या वेळी राज्याचे निवडणूक अधिकारी सुरेश हाळवणकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पक्षाच्या राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जारी केला होता; पण नांदेड महानगरासह १६ तालुक्यांच्या या जिल्ह्यत संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक बिघडले. आता घाईघाईने ग्रामीण जिल्ह्यच्या मंडल (तालुका) अध्यक्ष निवडीची प्रक्रिया उरकली जात असून त्यातही दोन मंडल अध्यक्षांची निवड थांबवावी लागली. महानगर भाजपच्या अंतर्गत १० पकी तीन मंडल अध्यक्षांची निवड टोकाच्या मतभेदांमुळे रखडली, तर नांदेड (द.) व अन्य दोन मंडल अध्यक्षांच्या निवडीनंतर वाद निर्माण झाला; पण या बेकायदेशीर निवडणुकांना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भागवत कराड यांनी स्थगिती दिली नाही.

सध्या भाजपच्या ग्रामीण जिल्ह्यतील मंडल अध्यक्षांच्या निवडीसाठी नेत्यांच्या दौऱ्यांचे सत्र सुरू आहे. बुधवारी दिवसभरात उमरी आणि नायगाव मंडल अध्यक्षांची निवड पक्षातील वाटणीच्या सूत्रानुसार झाली. तथापि धर्माबाद येथे निर्माण झालेला वाद नेत्यांना मिटवता आला नाही. तेथील मंडल अध्यक्षाचे नाव आता नंतर जाहीर होणार आहे, असे सांगण्यात आले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, बिलोलीतील संभाव्य कटकटींचा पूर्वअंदाज घेऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तेथे जाण्याचे टाळले होते. तशीच समयसूचकता त्यांनी बुधवारी धर्माबादच्या बाबतीत दाखविली. पहिल्या दोन दिवसांत बिलोली, देगलूर शहर आणि धर्माबादमध्ये वाद, भांडण, टोकाचे मतभेद समोर आल्यानंतर खासदार चिखलीकर यांनी गुरुवारी माहूर-किनवट मंडलाध्यक्षांच्या निवडीसाठी तेथे जाण्याचे टाळले. संघटन सचिव गंगाधर जोशी यांना तेथे पाठविण्यात आले. कंधार मंडल अध्यक्षांची निवड गुरुवारी करण्याचे ठरले होते. पण काही अडचणींमुळे ही निवड होऊ शकली नाही. वेगवेगळ्या भागात मंडल अध्यक्षांच्या निवडीत वाद निर्माण होत असताना इकडे २८ डिसेंबरच्या महानगर व जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भातील तयारी सुरू झाली आहे.

आमदार शिंदे-पवार यांची बाचाबाची

लोहा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि भाजपचे चिखलीकर समर्थक तालुकाध्यक्ष शरद पवार यांच्यात माळेगाव येथे गुरुवारी बाचाबाची झाली. माळेगाव यात्रेतील कुस्तीच्या आखाडय़ात शिंदे यांच्यापुढे पवार जात होते, तेव्हा शिंदे यांनी त्यांना हटकल्यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, पहिले दोन दिवस माळेगावकडे पाठ फिरवणारे खासदार चिखलीकर बुधवारी तेथे दाखल झाले, असे सांगण्यात आले.