भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवारांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचंही बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. पण आता एकनाथ खडसेंनी स्वत: यावर भाष्य करत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावरुन सुरु असलेल्या चर्चेसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा”.

सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही,” असं ते म्हणाले आहेत. “एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ… खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही हा कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणतात…
चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षांना आजवर त्यांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणती भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. हीदेखील अफवाच ठरेल”.

राष्ट्रवादी काँग्रेसकनेही केलं स्पष्ट
“एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली,” अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसंच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.