भाजपाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या नेत्यांना घरी बसवलं. पक्षासाठी त्यांनी केलेल्या कामाचाही विचार केला नाही. अनेकांना तिकीट देऊन मोठमोठ्या पदापर्यंत पोहचवल. पण त्यांना साधं पक्षाचं तिकीटही मिळू दिलं नाही, हे दुर्दैव आहे. प्रतिस्पर्धी ठरू नयेत यासाठी आपल्याच सहकाऱ्यांचा बळी घेतला गेल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलेल्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबूक पोस्ट करत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

“किती काळ सत्तेत राहिलात यापेक्षा सत्तेत असताना लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं. आपला पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडून आपण सत्तेत येण्याची स्वप्न दाखवली जातात, पण आता भाजपामधली मंडळी या ‘पुन्हा येण्याला’ कंटाळली आहे.”, असे म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा संदर्भ देत रोहित पवार म्हणाले, “सरकार पडणार की नाही यातून बाहेर पडा’ हा काही दिवसांपूर्वी तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी दिलेला सल्ला जरुर विचारात घ्या आणि चांगल्या भावनेने लोकांसाठी, राज्याच्या हितासाठी काम करा, असं केलं तर तुम्हाला नक्कीच शांतता लाभेल.”