१५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्याआधी नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा ‘सामना’ पाहण्यास मिळाला. निकालानंतर सगळं संपलं असेल असं वाटत असतानाच या वादाचा दुसरा अंक पाहण्यास मिळाला आहे. गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलंय.

भाजपाने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू

भाजपाने परवानी दिली ना तर यांचं नामोनिशाण संपवून टाकू, मी आज परत बोलतो आहे. भारतीय जनता पार्टी हा शिस्त पाळणारा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. मनाला पटलेलं नाही तरीही कार्यकर्त्यांनी सहन केलं आहे. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे असं म्हणत गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. एके काळी मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या की ठाणे जिल्ह्यासह MMR मध्ये महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लढू द्या. लढल्यानंतर ज्यांचे नगरसेवक जास्त त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यायचा आणि इतर पदं वाटून घ्यायची असं माझं मत होतं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत सांगितलं होतं. ते हो म्हणाले नाहीत आणि नाही म्हणाले नाहीत. आम्ही अपेक्षा करत होतो की कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पण काही ठिकाणी ती संधी मिळाली नाही.

नवी मुंबईत त्यांनी ५७ जागा मागितल्या होत्या…

नवी मुंबईत त्यांनी (शिवसेना) ५७ जागा मागितल्या होत्या, आम्ही त्यांना २० ते २२ जागा द्यायला तयार होतो. पण शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरु होत्या आणि मग त्यांनी एबी फॉर्म भरले, आम्ही भरले. त्यानंतर जे झालं ते चांगलं झालं. ठाण्यातल्या लोकांना ही करामत करता आली नाही. ठाण्यात भाजपाच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही लगाम खेचले गेले. पक्षाला जे मान्य आहे ते आम्ही मान्य केलं.

भाजपा हा शिस्त पाळणारा पक्ष आहे- गणेश नाईक

भाजपा शिस्तीचा पक्ष आहे, आदेश दिल्यावर तिथे बाकी काही येत नाही. ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची परवड झाली. हे मी बोलणार नाही तर कोण बोलणार? तरीही कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली हे कौतुकास्पद आहे. सगळ्या पक्षांनी वेगवेगळं लढलं पाहिजे असं मी आधीच बोललो होतो. ज्याचे नगरसेवक जास्त त्याला महापौर पद आणि इतर पदं मिळाली असती. पण हे संपूर्णपणे माझं मत आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत असंही गणेश नाईक म्हणाले.