भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. यामध्ये पडळकराच्या गाडीची पुढची काच फुटली. मात्र, या मुद्द्यावरून राज्या आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. पडळकरांनी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केल्यामुळेच अशा प्रकारे गाडीवर दगड फेकण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू असताना पडळकरांनी काल संध्याकाळी नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये एका व्यक्तीने पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकल्याचं दिसत आहे. हल्ल्याविषयी गोपीचंद पडळकर म्हणतात. हा व्हिडीओ शेअर करताना गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निषाणा साधला आहे. "प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे", असं ट्वीट गोपीचंद पडळकर यांनी व्हिडीओसोबत केलं आहे. प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे.@BJP4Maharashtra@PawarSpeaks pic.twitter.com/XSOzmUaU4i — Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 1, 2021 दगड फेकणाऱ्याचा रोहित पवारांसोबत फोटो! दरम्यान, काल संध्याकाळी उशीरा हा प्रकार घडल्यानंतर रात्री गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या ट्वीटर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्यासोबतचा अकाउंटवरून दगड फेकणाऱ्या संशयित व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये, "प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला. पण अशा भ्याड गल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता, ना आज दबला आहे ना उद्याही दबेल.घोंगडी बैठका सुरूच राहणार", अशी टीका केली होती. प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल. घोंगडी बैठका सुरूच राहणार. pic.twitter.com/909jRWb389 — Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 30, 2021 पडळकरांच्या गाडीवर दगडफेक; म्हणाले, “गोळ्या घातल्या तरी…!” बुधवारी संध्याकाळी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर कुणीतरी दगड फेकल्याची घटना घडली. “मड्डेवस्तीत बैठक झाल्यानंतर गाडीत बसलो आणि काही अंतरावर गेल्यावर गाडीवर दगड फेकण्यात आले. त्यानंतर ते सगळे पळून गेले. राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पवारांच्या नेतृत्वाखाली कशी गुंडगिरी चालते. कुणालातरी पुढे केलं असेल”, असा आरोप यानंतर पडळकरांनी केला आहे. “राज्यात आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्हाला लोकांची काळजी आहे अशा वावड्या उठवतात त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर तो असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या, तरी मी माघार घेणार नाही. हे सगळे पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं सगळं उघडं पडतंय, बुरखा फाटतोय. मला रोज मोबाईलवर धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे मेसेज येतात. गेल्या ५० वर्षांत त्यांनी अशीच दादागिरी राज्यात केली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे”, असंही पडळकर यावेळी म्हणाले.