संतोष मासोळे, धुळे

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून स्थान मिळालेला एकमेव मतदारसंघ म्हणजे धुळे. स्थानिक खासदार डॉ. सुभाष भामरे हे संरक्षण राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळतात. गेल्या वेळी युतीच्या वाटाघाटीत ही जागा भाजपला मिळाली. तिथे अखेरच्या क्षणी सेनेच्या पदाधिकाऱ्याला तिकीट देऊन भाजपने निवडून आणले. मंत्रिपद बहाल केले. मतदारसंघात पक्षीय बांधणी मजबूत केली. परंतु, डॉ. भामरे आणि स्थानिक आमदार, पदाधिकारी यांच्यातील वाद अखेपर्यंत कायम राहिले. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. सेनेशी युती होते की नाही, यावर बरेच काही अवलंबून आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये झालेल्या चुका टाळून काँग्रेस नव्याने व्यूहरचना करण्याच्या प्रयत्नात आहे.

या मतदारसंघात धुळे जिल्ह्य़ातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य़ आणि सटाणा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकदा जनसंघ, तीन वेळा भाजपला संधी मिळाली. अन्य कालावधीत मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. २००९ मध्ये भाजपचे प्रतापराव सोनवणे, तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. भामरे यांनी विजय मिळविला. गेल्या वेळी चर्चेतही नसलेले शिवसेनेचे डॉ. सुभाष भामरे यांचे नाव अचानक लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून पुढे आले. पक्षात निष्ठावान विरुद्ध नवखे प्रवेशकर्ते असे दोन गट पडले. पक्ष नेतृत्वाला समजूत काढून अंतर्गत कलह शमवावा लागला.

मागील निवडणुकीत मोदी लाटेचा भाजपच्या बहुतांश उमेदवारांना फायदा झाला. डॉ. भामरे यांनी काँग्रेसचे अमरीश पटेल यांना जवळपास सव्वालाख मतांनी पराभूत केले. डॉ. भामरे यांच्यासमोर पटेल हे पराभूत होण्यामागे वेगवेगळी कारणे होती. एक तर पटेल यांचा शिरपूर विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात नाही. यामुळे ते आयात केलेले उमेदवार आहेत, असा प्रचार जाणीवपूर्वक केला गेला. निवडणुकीत जातीपातीचे राजकारण महत्त्वाचे ठरले. मराठा आणि मुस्लीमबहुल मतदारसंघात माजी मंत्री रोहिदास पाटील आणि पटेल यांच्यातील राजकीय दुही डॉ. भामरेंच्या पथ्यावर पडली. संसदेत प्रथमच खासदार म्हणून गेलेल्या भामरे यांच्यावर थेट संरक्षण खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली गेली. यामुळे प्रस्थापितांच्याही भुवया उंचावल्या. नुकत्याच झालेल्या धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्याशी त्यांचे झालेले वाद सर्वश्रुत आहेत. मालेगाव येथील भाजप नगरसेवकांनी डॉ. भामरेंच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठांकडे नाराजी प्रगट करत धुसफुस चव्हाटय़ावर आणली.

काही विकासकामे मार्गी

साडेचार वर्षांत मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भामरे यांनी भर दिला. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग मंजुरी, रेल्वे मार्गातील पाच पूल, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन प्रकल्प, रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळवला. विखरण येथे प्रस्तावित ५०० मेगावॉटचा सौर प्रकल्प, मालेगाव शहरात उड्डाण पुलाचे काम अशा विकासकामांच्या बळावर भाजप निवडणुकीला सामोरे जाईल. पक्षांतर्गत विरोधाला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणूकपूर्व आढावा बैठकीत मालेगाव, सटाणा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दांडी मारून प्रदेशाध्यक्षांसमोर आपली नाराजी प्रगट केली. धुळ्यातून अनिल गोटे यांचा त्यांना विरोध आहे. शिवसेनेने वेगळी चूल मांडल्यास मतविभागणीचा लाभ पदरात पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

अमरीश पटेल हे लढणार नाहीत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, नाशिकच्या मविप्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे हे इच्छुकांच्या रांगेत आहेत. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील हे प्रमुख दावेदार असतील. त्यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत अनेकदा दिले आहेत.

डॉ. भामरे यांच्या विजयात मराठा-पाटील समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाटील यांच्या उमेदवारीमुळे तो समाज काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मतदारसंघात अल्पसंख्याक आणि मुस्लीम समाजाची निर्णायक भूमिका आहे. भाजपमधील अंतर्गत कलह, युतीतील मतभेद लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी मोर्चेबांधणी करीत आहे.

भाजप सरकारच्या कारकीर्दीत कोणतीही विकासाची कामे झाली नाहीत. बहुचर्चित मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग किंवा सुलवाडे-जामफळ पाणी योजनेलाही गती मिळाली नाही. शेतमालास अपेक्षित भाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. नव्याने रोजगार उपलब्ध झाला नाही. उलट अस्तित्वातील अनेक उद्योग बंद पडले.

      – श्यामकांत सनेर     (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)