सर्व विरोधक एकत्र आल्याने सातपैकी पाच समित्या ताब्यात

सोलापूर महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्ताधारी भाजपची आज मोठी नाचक्की झाली. सात पैकी ५ समित्या या विरोधकांनी जिंकल्या तर दोन ठिकाणी नशिबाने साथ दिल्याने भाजपला विजय मिळाला. विरोधकांच्या या खेळीने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपने सत्ता संपादन केली खरी; परंतु एकूण १०५ सदस्यांच्या सभागृहात भाजपला  बहुमत मिळविता आले नव्हते. ४९ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सत्ता खेचून आणली होती. त्या वेळी शिवसेना व काँग्रेससह विरोधक विखुरले गेल्याचा लाभ भाजपला झाला होता. मात्र त्यानंतर विविध विषय समित्यांमध्ये पालिका सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार प्रत्येकी नऊपैकी भाजपच्या वाटय़ाला चार सदस्य मिळाले तर विरोधकांकडे त्यापेक्षा जास्त म्हणजे प्रत्येकी पाच सदस्यांची संख्या होती. विषय समित्याच्या सभापती निवडणुकांची प्रक्रियेत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे ठरविले होते. त्यानुसार भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला गेला.

या पाश्र्वभूमीवर गुरुवारी झालेल्या विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असताना महत्त्वाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या सुवर्णा जाधव गैरहजर राहिल्या. तेव्हा भाजपच्या अश्विनी चव्हाण व शिवसेनेच्या कुमुद अंकाराम याना समसमान म्हणजे प्रत्येकी चार मते पडली. त्यामुळे चिठ्ठीचा पर्याय निवडला असता त्यात भाजपच्या बाजून नशिबाने साथ दिली. या शिवाय वैद्यकीय साह्य़ समितीच्या सभापती निवडीच्या भाजपला नशिबाने हात दिला.

विरोधकांना हिणवू नका;शिवसेनेचा टोला

सातपैकी पाच विषय समित्या विरोधकांनी जिंकल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी, भाजपला आपण जमिनीवर आणल्याचे सांगितले. भाजपने विरोधकांना हिणवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.