मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमधील डावलले गेलेल्या इच्छुकांमधील उद्रेक बुधवारी बाहेर पडला. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे व खासदार भागवत कराड यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. पुण्यात एकाने ए, बी फॉर्मच गिळला. ठाण्यातही भाजपमधील नाराजी उफाळून आल्याने युतीबाबत समाधानी नाही, असे पत्रक काढण्याची नामुष्की आमदार संजय केळकर यांच्यावर आली.

चंद्रपूरमध्ये परस्पर यादी बदलल्याने भाजपच्या अध्यक्षाची गच्छंती करण्यात आली. पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याने राज्यातील भाजप कार्यालयांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली. उमेदवारीवरून भाजप, शिवसेना शिंदे व ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेसमधील डावलले गेलेल्यांनी असंतोषाला वाट करून दिली. ठिकठिकाणी पक्षाच्या विरोधात नाराजांनी घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. पक्षाने उमेदवारी नाकारल्यावरही अपक्ष म्हणून किंवा अन्य पक्षांमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांनी माघार घ्यावी म्हणून दबावतंत्र किंवा गोडीगुलाबीने प्रयत्न सुरू झाले होते.

नेत्यांची वाहने रोखली

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते व मंत्री अतुल सावे व खासदार डॉ. भागवत कराड यांना लक्ष्य केले होते. त्यांच्या गाड्या अडवून त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. काही नाराजांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. पक्षाचे आमदार संजय केनकर यांनी मध्यस्थी करीत सर्व नाराजांना शांत केले. शेवटी भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला. या गोंधळात एकाच्या कानशिलात लगावण्यात आली. महिला कार्यकर्त्या अधिक आक्रमक झाल्या होत्या. सावे यांनी निष्ठावतांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप नाराजांकडून करण्यात येत होता.

ठाण्यात आमदारांची नाराजी

ठाण्यातही भाजपमधील नाराजी उफाळून आली. शिवसेना शिंदे गटाबरोबर युती केल्याने पक्षाच्या वाट्याला ४० जागा आल्या आहेत. भाजपने गेले वर्षभर निवडणुकीची तयारी केली होती. स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात आली होती. पण नेतृत्वाने शिंदे यांच्या शिवसेनेशी जुळवून घेण्याचा आदेश दिल्याने स्थानिक नेतेमंडळींचाही नाइलाज झाला. कार्यकर्त्यांमधील नाराजी उफाळून आल्याने ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांना समाजमाध्यमातून मी समाधानी नाही, असे जाहीर करावे लागले. केळकर यांच्या या भूमिकेमुळे ठाणे भाजपमध्ये सारे आलबेल नाही हाच संदेश गेला.

शहराध्यक्षांची उचलबांगडी

चंद्रपूरमध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांनी मंजूर करून पाठविली होती. पण स्थानिक महानगरध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी उमेदवारांची नावे बदलली. पक्षाने त्याची गांभीर्याने दखल घेत अध्यक्षांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात केली.

कृपाशंकर सिंह यांच्या विधानाने वाद मुंबईत समाजवादी पक्षाची ताकद मर्यादित आहे. पण अबू आसिम आझमी आणि रईस शेख या पक्षाच्या दोन आमदारांमधील वादात परस्परांच्या समर्थकांना डावलण्यात आले. मुंबईत वंचितच्या वाट्याला आलेल्या १६ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्जच दाखल केलेले नाहीत. यामुळे काँगेसची कोंडी झाली. मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषक महापौर होऊ शकतो या भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या विधानावरून वादंग निर्माण झाले. शिवसेनेने मराठीला डावलण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.