शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, १६ खाती देण्याची भाजपाची तयारी-सूत्र

सरकार स्थापनेचा पेच कधी सुटणार हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरुन निर्माण झालेला प्रश्न हा सुटण्याचा मार्ग काही सुकर होताना दिसत नाही. लवकरच नवं सरकार स्थापन होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. केंद्र सरकारकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आराखडाही सोपवला असेही समजते आहे. दरम्यान भाजपाने शिवसेनेला १६ मंत्रिपदांची ऑफर दिली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपाने मान्य केलेली नाही असंही सूत्रांच्या माहितीनुसार समजतं आहे. असं असल्याने आता शिवसेनेच्या कोर्टात चेंडू आहे असं समजतं आहे. त्यामुळे आता तरी हा पेच सुटेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १७ खाती हवी आहेत. ज्यामध्ये गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. मात्र भाजपाने १६ खाती देण्यावर सहमती दर्शवली असून त्यामध्ये गृह, अर्थ आणि नगरविकास खाती नाहीत. महसूल मंत्रीपद शिवसेनेला दाखवण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे असंही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने अडीच वर्षांसाठी दावा सांगितला आहे. त्याचमुळे चर्चेचे घोडं अडलं आहे. आता १६ मंत्रिपदांच्या ऑफरनंतर चर्चा सुरु होणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे.

आणखी वाचा- सत्तेची समीकरणं मांडणाऱ्यांवर काहीही बोलणार नाही : फडणवीस

शिवसेनेची भूमिका मांडत संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेत आहेत आणि मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. तसंच शिवसेनेला सगळं काही समसमान ठरल्याप्रमाणे हवं आहे असंही ते सांगत आहेत. आता शिवसेनेचं काय ठरणार? सत्तास्थापनेची कोंडी फुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिवाळीच्या दिवशी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचं ठरलेलं नाही असं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाले. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेतली चर्चा थांबललेली आहे. दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. ते सत्तास्थापनेचा दावा करणार नसले तरीही दबाव तंत्राचा वापर ते करत आहेत हे नक्की आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडे १७० जणांचा पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. आता या सगळ्या पेचावर भाजपा आणि शिवसेना काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp is likely to give 16 ministry to shivsena says sources scj

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या