पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुण तरुणीच्या विसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह यावा याकरता प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या आरोपाला आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अभ्यास केवळ १०० कोटींच्या वसुलीचा असल्याने त्यांना या प्रकरणातलं काहीही कळणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले, “जसंजशी विधानसभा जवळ येईल, तसं आमच्या पक्षात…”

नेमकं काय म्हणाले केशव उपाध्ये?

पुण्याच्या अपघातातील मृतक हे एका बारमधून बाहेर पडले होते, त्यामुळे ते मद्य पिऊन होते, हे सर्वांनाच माहिती आहे. यात कुठली आली वेगळी माहिती? जरी मृतक मद्य पिऊन होते, हे निष्पन्न झाले, तरी धडक मागून दिली असल्याने या प्रकरणात मृतक मद्य पिऊन होते काय किंवा नव्हते काय, याने प्रकरणावर काहीही फरक पडणार नाही, असं केशव उपाध्याय म्हणाले. तसेच माजी गृहमंत्र्याचा अभ्यास कायद्याचा नसून केवळ १०० कोटींच्या वसुलीचा असल्याने त्यांना याप्रकरणातलं काहीही कळणारच नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, पोर्श कार अपघात प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुण तरुणीच्या विसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह यावा याकरता प्रयत्न सुरू आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता, “पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरू आहेत.” असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – “शरद पवार काहीही घडवू शकतात”, अनिल देशमुख यांचे सूचक विधान; म्हणाले, “महाराष्ट्रातही चमत्कार..”

याबरोबरच “तरुण तरुणीच्या विसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह यावा याकरता प्रयत्न सुरू असून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात दारुचा अंश टाकण्यात आल्याची माझी खात्री आहे. विशाल अग्रवलाच्या मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. त्यावेळी शासनाचा दबाव त्यावर कसा होता हे सर्वांना माहित आहे. तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने विशाल अग्रवलाच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असा माझा खुला आरोप आहे”, असंही त्यांनी म्हटलं होते.