अमरावती : नायब तहसीलदारांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. अडकर यांच्या न्यायालयाने ३ महिने कारावास, २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. मारहाणीची ही घटना ३० सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी  वरूड येथील तहसील कार्यालयात घडली होती.

न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, वरूड येथील नायब तहसीलदार नंदकिशोर  काळे हे आपल्या कक्षात असताना डॉ. अनिल बोंडे यांनी त्यांना तहसीलदारांच्या कक्षात बोलावले. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेअंतर्गत माझ्या लोकांच्या २४० प्रकरणांमध्ये त्रुटी का काढल्या, अशी विचारणा करून बोंडे यांनी नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना शिवीगाळ केली. तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळील शासन निर्णयाची प्रत व फाईल फाडून जिवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी  काळे यांनी वरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी  बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.  या प्रकरणात न्या न्यायालयामध्ये ८ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. एस.एस. अडकर यांच्या न्यायालयाने डॉ. अनिल बोंडे यांना  शिक्षा सुनावली.

 बोंडे यांना जामीन मंजूर

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर बोंडे यांनी आपल्या वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला. दंडाची रक्कम भरल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.