अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा शहर भाजपने निषेध केला आहे. भाजपने आज, रविवारी केलेल्या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजप पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास शहर भाजपच्या वतीने १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी आंदोलनात बोलताना केली.
शहरातील जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शहर भाजपच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारांच्या घोषणा देऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्या मुर्दाबादच्याही घोषणा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी सरचिटणीस निखिल वारे, युवा मोर्चा अध्यक्ष रुद्रेश अंबाडे, नगरसेवक महेश लोंढे, आकाश त्रिंबके, सतीश शिंदे, संजय गायकवाड, उदय अनभुले, ज्ञानेश्वर धिरडे बाबासाहेब सानप, मिलिंद भालसिंग, सुरेश लालबागे, राजेंद्र फुलारी, भार्गव फुलारी, अभिजित बुरुडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
अनिल मोहिते म्हणले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यांचा जो अपमान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केला, त्याबद्दल शहर भाजपच्या वतीने त्यांचा निषेध करत आहोत. हिंदूंची खुलेआम कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानशी तुलना करणे ही महाराष्ट्राला अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे. औरंगजेबाच्या समाधीचं उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा समाजाला नाही. या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसचा बुरखा फाडला गेला आहे.
‘लव जिहाद, व्होट जिहाद’ करणाऱ्या, अतिरिकी प्रवृत्तींना आजपर्यंत काँग्रेसने पोसले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशीही मागणी अनिल मोहिते यांनी केली. यावेळी बाबासाहेब सानप यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
भाजपने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राज्यभर ठिकठिकाणी निषेध आंदोलने सुरू केली आहेत. सपकाळ यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तव्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जीभ छाटणाऱ्यांस भाजपने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले मात्र अद्याप शहर काँग्रेसकडून त्यावर प्रत्युत्तर दिले गेलेले नाही.

