scorecardresearch

“उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये, स्वत: काही केलं नाही…” आशिष शेलारांचं टीकास्त्र!

या महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याचं नाव म्हणजे संजय राऊत, असंही शेलार म्हणाले आहेत.

“उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये, स्वत: काही केलं नाही…” आशिष शेलारांचं टीकास्त्र!
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीने पाठविलेल्या नोटीसीसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, करोनाकाळात डॉक्टर व परिचारिकांनी पळ काढला होता, असे वादग्रस्त विधान केले. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने संताप व्यक्त केला आणि आंदोलनाचा इशाराही दिला. तर संजय राऊतांच्या विधानावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून झालेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, “या महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याचं नाव म्हणजे संजय राऊत आहे. बेतालपणे बोलायचं अगदी पातळी सोडून बोलायचं. असंबंध बोलायचं. दुर्दैवं आहे की अशा पद्धतीने ज्या डॉक्टारांनी, परिचारिकांनी, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करोना काळात खऱ्या अर्थाने स्वत:चा जीव धोक्यात घालून, राज्याची आणि जनतेची सेवा केली, त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलायचं. यांनी अहंकाराचा परमोच्च बिंदू गाठला आहे, म्हणून जनता यांना सोडणार नाही. जर डॉक्टर्स आंदोलन करणार असतील तर त्यांना आमचं समर्थन आहे आणि त्यांच्या आंदोलनातील मागण्याही चुकीच्या नाहीत. खरंतर संजय राऊतांनी माफी मागितलीच पाहिजे. ”

हेही वाचा – “२५ वर्षांत २२ हजार कोटी खर्चून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत, या खड्ड्यातले मृत्यू…” आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर!

राज्यातून जे प्रकल्प परराज्यात गेले त्यावरून शिवसेनेने(ठाकरे) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगोदर हे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी पंतप्रधानांकडे मागणी करावी आणि मग दावोसला जावं, असं म्हटलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, “खाई त्याला खवखव. उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये. स्वत: काही केलं नाही, स्वत:ला काही करता आलं नाही. दोवोसमध्ये जाऊन एक लाख कोटींच्या वर सामंजस्य करार मुख्यमंत्री करत आहेत. या ठिकाणी लाखो मुंबईकर स्वत:चं स्वप्नपूर्ती होते आहे, त्यात संमेलीत होत आहेत. मग यामध्ये मी कुठे हे दाखवण्याचा त्यांचा वायफळ प्रयत्न आहे. म्हणून माझा सल्ला आहे, जीभ नाकाला लावायचा प्रयत्न करू नका.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 15:03 IST

संबंधित बातम्या