भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. सामना अग्रलेखातून भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अविश्वास ठरावावरील भाषणावरून टीका करण्यात आली होती. यासंदर्भात आशिष शेलार यांनी ट्वीट केलं असून त्यातून संजय राऊतांना खोचक टोला लगावण्यात आला आहे. तसेच, राऊतांचा उल्लेख ‘पत्रकार पोपटलाल’ असाही केला आहे.
काय म्हटलंय ट्वीटमध्ये?
आशिष शेलार यांनी संजय राऊतांना अहंकारी व निराशावादी म्हटलं आहे. “सूर्याचे मालक कुणीच नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. पण प्रभादेवीच्या गल्लीत बसून अग्रलेख लिहिणाऱ्या पत्रकार पोपटलाल, तुम्हाला कल्पना आहे का? तुमचं सरकार आल्यावर तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाचे मालक असल्यासारखे वागत होतात. तुमच्यासारखे अहंकारी व निराशावादी आम्ही नाही. म्हणून आम्हाला खात्री आहे की मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य नक्की उगवेल. या देशातील गुलामगिरीची मानसिकता संपेल. ब्रिटिशांनी सोडलेल्या गुलामगिरीच्या खुणा पुसून अमृतकाळात देश तेजस्वी सूर्यप्रकाशात उजळून जाईल”, असं शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“तुमच्या डिक्शनरीत देशहित हा शब्द असता तर ब्रिटिशकालीन कायदे इतिहासजमा करण्याचे धाडसी पाऊल उचलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे तुम्ही आज अभिनंदन केले असते. पण तुम्ही पत्रकार पोपटलालच”, असा टोलाही शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
“अहंकाराने खचाखच भरलेले गोडाऊन!”
दरम्यान, या ट्वीटमध्ये शेलार यांनी संजय राऊतांना अहंकाराने खचाखच भरलेले गोडाऊन म्हटलं आहे. “तुम्ही म्हणजे नकारात्मकता, द्वेष, तिरस्कार, कोतेपणा, स्वार्थ व अहंकाराने खचाखच भरलेले गोडाऊन आहात. पण लक्षात ठेवा. २०२४ ला सेवा, समर्पणाचा सूर्य उगवेल. तुमच्या अहंकारी सूर्याला आणखीन मोठे ग्रहण लागेल”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी संजय राऊत व ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
काय म्हटलं होतं सामना अग्रलेखात?
शनिवारच्या सामना अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत अविश्वास ठरावावर केलेल्या भाषणावर परखड टीका करण्यात आली होती. “आता मोदी म्हणतात, मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय? अविश्वास ठरावाच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले व सत्ता पक्षाची चिडचिड अनुभवता आली. संसदेतून बाहेर फेकलेले राहुल गांधींचे भाषण हे त्या चिडचिडीमागचे मुख्य कारण. दहा वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आज राहिलेले नाहीत. सत्यवचनी व बेडर गांधींसमोर मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे”, असं सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.