Ashish Shelar on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्याचा काळ लोटला तरी राज्यात अभूतपूर्व अशी शांतता पसरली आहे. असा निकाल कसा काय लागला? याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. फक्त पराभव झालेलेच नाही, तर ज्यांचा विजय झाला, तेही धक्क्यात आहेत, अशी भूमिका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त केल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज ठाकरे यांचा इशारा भाजपाच्या विजयाकडे होता. भाजपाने मागच्या दोन निवडणुकांत जिंकलेल्या जागांची आकडेवारीही यावेळी राज ठाकरेंनी उद्धृत केली. यानंतर आता भाजपाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, “श्रीमान राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात एक नरेटीव्ह स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. भाजपाने कधीच तडजोडीचे राजकारण केले नाही. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण यावरील राजकारणात आम्ही कधीच तडजोड केली नाही. यातून तुम्हाला शिकण्यासारखे काही असेल तर नक्कीच शिका. हा मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो.”

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

“राज ठाकरे यांनी जर तडजोडीचे आरोप केले असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की, अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणात आम्ही कधीच तडजोड केली नाही. काश्मीर मधून कलम ३७० हटवण्याच्या विषयावर आम्ही कधीच तडजोड केली नाही. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत कधीच तडजोड केली नाही आणि होणार नाही. वेळ, काळ आणि राजकीय परिस्थिती पाहून सरकारे चालवताना जे तात्कालिक घडते, ज्याचा श्रीमान राज ठाकरे जो अर्थ लावून त्याचे सवंग “निरुपण” ते करू पाहत आहेत”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

भाजपाशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही राज ठाकरेंवर टिकास्र सोडले आहे. अजित पवारांचे ४१ आमदार कसे काय निवडून आले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “राज ठाकरे यांना नेहमीच उशीरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेत स्वतःच्या घरातच दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आमच्या ४२ जागा कशा आल्या? हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला आहे. मात्र आपल्या सुपुत्राचा दारूण पराभव कसा झाला आणि पक्षाची एकही जागा का निवडून आली नाही. यावर त्यांनी भाष्य करावे. यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागले पाहीजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish shelar slams raj thackeray over his speech alleges his fake narrative kvg