शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि थेट गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिलं आहे. त्यावर आता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री असताना पालिकेची निवडणूक पुढे का ढकलली?, असा सवाल उपस्थित केला आहे.

“आदित्य ठाकरे आमच्या मतांवर निवडून आले. भाजपाची मते नसती तर आदित्य ठाकरेंचा पराभाव झाला असता. हिंमतीची भाषा करायची असेल तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे,” असं आव्हान शेलार यांनी दिलं आहे.

“ठाकरेंनी मराठेशाहीतील लढवय्यांबद्दल हिणवणारी वक्तव्य केली”

उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात शेलार यांच्यावरही निशाणा साधला होता. “घाबरलेल्या मनस्थितीत माणसं चुकीचा संदर्भ देतात. स्वत:च्या आजोबांना शेलारमामा म्हणत उद्धव ठाकरेंनी माझ्यावर आक्षेप घेतला. त्यांनी शिवाजी महाराज यांच्या मराठेशाहीतील लढवय्यांबद्दल हिणवणारी वक्तव्य केली आहेत. स्वत:ची बाजू मांडताना इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तीवर सुद्धा कुश्चितपणे बोलण्याची सवय उद्धव ठाकरेंना आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

“महाराष्ट्रासमोरील आव्हाने फडणवीस निधड्या…”

सामना अग्रलेखातून फडणवीसांसमोरील आव्हाने! महाराष्ट्र की गुजरात, असा निशाणा साधण्यात आला आहे. “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. निधड्या छातीने महाराष्ट्रासमोरील आव्हाने स्वत:च्या अंगावर घेण्याची त्यांची कार्यशैली आहे. तुमच्यासारख घरी बसून नाहीत. मुंबईतील मराठी माणसाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान स्वीकारतो,” असेही शेलार यांनी म्हटलं.