“महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणुकीवरून कलगीतुरा सुरू आहे. एवढं टेन्शन घेण्याचे कारण काय?शिवसेनेने मनाचा मोठेपणा दाखवून एक जागा कमी लढावी आणि आघाडीधर्म तरी पाळावा. काँग्रेस जे करत आहे त्याला राजकारण म्हणतात. असंगाशी संग केल्यावर काय वेगळं होणार,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरवून शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.


राज्यातील विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा होती. मात्र ९ जागांसाठी १० उमेदवार उभे केल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेत माघार कोण घेणार यावरून वाद सुरू आहेत. काँग्रेसनं दोन उमेदवार उभे केल्यानं निवडणूक ही अटळ मानली जात आहे. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “विधान परिषदेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. उद्धवजी काँग्रेस जे करते आहे त्याला राजकारण करणे म्हणतात. असंगाशी संग केल्यावर यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नसते,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

“आज मदर्स डे आहे. सोनिया मतोश्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजच्या सारखा उत्तम दिवस नाही. पुण्य मिळेल, आशीर्वादही मिळेल,” असंही भातखळकर म्हणाले. “महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणुकीवरून कलगीतुरा सुरू आहे. ‘कार्यकारी’ आक्रमकता गुंडाळून संवेदनशील भाषेवर आले आहेत. एवढं टेन्शन घेण्याचे कारण काय? शिवसेनेने मनाचा मोठेपणा दाखवून एक जागा कमी लढावी आणि आघाडीधर्म तरी पाळावा, असंही ते म्हणाले.