भाजपाची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आसाममध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा बनवण्यासंदर्भातील हलचाली सुरु झाल्या आहेत. यावरुनच आता देशातील राजकारण तापल्याचे चिन्ह दिसत आहे. भाजपाच्या विरोधकांनी या कायद्यांना आतापासूनच विरोध करण्यास सुरुवात केलीय तर भाजपाकडून याचे समर्थन केलं जात आहे. शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये लव्ह जिहादवर एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या टीकेच्या वृत्तांकनावरुन आता भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नक्की वाचा >> “भाजपा नेत्यांच्या घरातील आंतरधर्मिय विवाह ‘लव्ह जिहाद’ आहेत का?”

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सामनामध्ये छापून आलेल्या ओवेसींच्या वक्तव्याच्या बातमीचे कात्रण ट्विटरवरुन शेअर केलं आहे. ‘लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यघटनेचे उल्लंघन ठरेल’ या मथळ्याखाली ओवेसींच्या फोटोसहीत छापून आलेल्या बातमीचा फोटो पोस्ट करत, “ज्वलंत हिंदुत्ववादी शिवसेनेच्या महापौरांनी लव्ह जिहादचे समर्थन केल्यानंतर आज सामानात ओवेसीची ही बातमी छापून आली आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी इस्रायल सारखे कायदे करा असे अग्रलेख लिहणारा सामना आणि शिवसेना जाणत्यांच्या खांद्यावर आणि काँग्रेसच्या मांडीवर नव्या ब्रिगेडी वळणावर आली आहे,” असा टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये जाणता शब्दाचा उल्लेख करत भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर बसून शिवसेना ही भूमिका घेत असल्याची टीका केली आहे.

काय म्हणाले ओवेसी?

भाजपाकडून कायद्याची मागणी होत असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी भाजपाला सुनावलं आहे. “विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम १४ व २१ मोठं उल्लंघन होणार आहे. त्यांनी (भाजपा) घटनेचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय,” अशा शब्दात ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपा शासित काही राज्यांमध्ये लव्ह जिहादच्या घटना आळा घालण्यासाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातही कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. मात्र, शिवसेनेसह काँग्रेसकडून या मागणीला विरोध होताना दिसत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना वाढल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यात लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आला होता.