भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर वक्तव्य केले आहे. एक्झिट पोलमध्ये आलेल्या आकडेवारीत ३० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी लावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने काहीच फायदा होणार नाही, असं मी आधीपासून सांगत होतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अनुमान पाटील यांनी लावले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “२०१४ ला नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून उदय होण्याआधी भाजपाला नामोहरम करण्याचे प्रयत्न व्हायचे. त्या प्रयत्नांना यशही मिळायचं. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून ते प्रयत्न केले जायचे. पण २०१४ नंतर मोदींवर होणारे आरोप हे राजकीय आरोप असल्याचे लोकांना समजले. लोकांचा मोदींवर विश्वास बसला. मुंबई गुजरातला जोडणार, मराठी महापौर करणार नाही, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही या सगळ्या आरोपांवर लोकांना आता विश्वास राहिलेला नाही. मोदींचा कारभार पारदर्शी आहे याची जाणीव लोकांना आता झाली आहे.”

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी युती केली आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “ज्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळी त्यांच्या एकत्र येण्याचा काही फायदा होणार नाही, हे मी म्हणत होतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ४५, राज ठाकरेंच्या मनसेला २०, भाजपाला ९०, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४० हे मी सांगत होतो. मी काही भविष्यकार नाही. ४७ वर्ष विद्यार्थी चळवळ, राजकीय चळवळीत काम केल्याने मी हे अनुमान लावलं होतं.” दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर, सांगली, पिंपरी चिंचवड मध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचे सुतोवाच केले.

२०१७ चा मुंबईतील निकाल

दरम्यान २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे गट) ८४, भाजपा ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला होता. ८४ जागांसह शिवसेना (ठाकरे गट) सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाने प्रथमच जोरदार मुसंडी मारली होती. कारण २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपा अवघ्या ३१ जागा जिंकली होती.