“बिहार निवडणुकीतील भाजपाचा विजय म्हणजे पंतप्रधानांच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन”

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

“बिहारमधील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाचे समर्थन केले आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी व्यक्त दिली.

“बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि जनतेचे आभार मानतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली हे यश मिळाले आहे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या बूथपातळीपासून संघटनात्मक बळकटीसाठी देशभर व्यापक मोहीम चालविली होती, त्याचा लाभ पक्षाला होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधत दिलं उत्तर; म्हणाले…

“बिहारमधील भाजपाच्या मोठ्या यशाबद्दल आपण पक्षाचे त्या राज्याचे निवडणूक प्रभारी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र भाजपातर्फे विशेष अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये भाजपाने जिंकलेल्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस वाढ झाली आहे. प्रमुख पक्षांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी असताना, भाजपाचे यश अधिक उठून दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपा विजयी होण्यासाठी समर्पण भावनेने अपार मेहनत केली,” असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- अभिनंदन करणाऱ्या संजय राऊतांना फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले…

भाजपाला निवडणुकीत पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’, या सूत्रानुसार सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचा आहे. त्यांच्या या विकासाच्या राजकारणाचे बिहारसोबतच देशभरातील ठिकठिकाणच्या जनतेने समर्थन केले आहे. कोरोनाच्या संकटात अनेक विकसित व श्रीमंत देश हतबल झाले असताना भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महासाथीचा प्रभावी मुकाबला केला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोरगरीबांना व स्थलांतरित कामगारांना या संकटात मदत पोहचवली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देशभर प्रभावी सेवाकार्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले. या सर्वामुळे जनतेने भाजपाला निवडणुकीत पसंती दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp leader chandrakant patil speaks on bihar election 2020 result former cm devendra fadnavis pm narendra modi jud

ताज्या बातम्या