Premium

“अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, पडळकरांच्या विधानावर भाजपाकडून जाहीर माफी, म्हणाले…

भाजपाने अजित पवारांची जाहीर माफी मागितली आहे. शिवाय त्यांनी गोपीचंद पडळकरांनाही समज दिली आहे.

gopichand padalkar on ajit pawar
भाजपाकडून अजित पवारांची जाहीर माफी (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशा आशयाचं विधान पडळकरांनी केलं. पडळकरांच्या या विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून अजित पवार गटातील नेते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांच्या विधानाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे. अजित पवारांनी मोठ्या मनाने पडळकरांना माफ करावं, असंही बावनकुळे म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अजित पवारांविरोधात गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भारतीय जनता पार्टी कधीही याचं समर्थन करणार नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. एखाद्याशी आपलं पटत नसेल किंवा महायुतीत असून आपले विचार वेगळे असतील. तुमचे मतभेद असतील. पण मनभेद तयार करून व्यक्तीगत टीका-टिप्पणी करणं, हे राज्याच्या संस्कृतीला धरून नाही. भाजपाच्या संस्कृतीलाही शोभणारं नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर हे अजित पवारांबद्दल जे काही बोलले, त्याबद्दल मीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो.”

हेही वाचा- “…तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ”, अजित पवार गटाचा फडणवीसांना थेट इशारा

“आपलं कितीही वैर असलं तरी पडळकरांसारखं कुणीही कुठल्याही नेत्यांबाबत बोलू नये. कितीही मतभेद असले तरी सार्वजनिकपणे कुणाचा अपमान करणे, आपल्या रक्तात नाही. विरोधी पक्ष असला तरी त्यांच्यावर संस्कारमय पद्धतीने टीका करायला हवी. पक्षीय राजकारणात टीका केली जाऊ शकते. पण व्यक्तीगत टीका केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पडळकर जे काही बोलले आहेत, त्यांना अजित पवारांना मोठ्या मनाने माफ करावं. मीही अजित पवारांना याबद्दल बोलणार आहे,” असंही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक

गोपीचंद पडळकरांवर काही करवाई केली जाणार आहे का? असं विचारंल असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “गोपीचंद पडळकरांना आम्ही सांगितलं आहे की, यापुढे अशापद्धतीची वक्तव्ये करू नयेत. एका जबाबदार विधानपरिषद सदस्याने अशापद्धतीने बोलू नये. ते भाजपाचे जबाबदार नेते आहेत. पण त्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवारांचं मन दुखावलं आहे, त्यासाठी मी क्षमा मागतो.”

हेही वाचा- “हात जोडून कळकळीची विनंती, मोदींची इच्छा पूर्ण करा”, सुप्रिया सुळेंकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule apology from bjp to ajit pawar for gopichand padalkars statement rmm

First published on: 21-09-2023 at 15:18 IST
Next Story
“२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान