संजय राऊतांच्या अस्वस्थतेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुन दिसतं असा टोला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीकाही केली आहे. त्याचबरोबर सहा आठवड्यांचं अधिवेशन घेऊन मग विरोधकांच्या भूमिकेवर बोला असंही त्या म्हणाल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, संजय राऊत अस्वस्थेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांमुळे दिसतं. एकच कोडं आहे, कुणीही हरामखोर म्हटलेलं नसताना मी हरामखोर नाही हे का सिद्ध करावं लागतंय? संजय राऊत, माझं आवाहन आहे की तुम्ही सहा आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं.


सत्ताधाऱ्यांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात असताना आता संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वीच त्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. “विरोधी पक्षांनी आमच्यामध्ये टांग अडवायची गरज नाही. आमचं आम्ही बघू. संजय राऊत काय करतात किंवा करत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. तीन पक्षांचे नेते प्रत्यक्ष काय करतात हे त्यांना दिसत नसेल, तर तो त्यांचा दृष्टीदोष आहे. मुळात त्यांनी महाविकासआघाडीकडे पाहू देखील नाही. उत्तम काम सुरू आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते.

आणखी वाचा- “हे तर भाजपाचं वैफल्य”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला!

दरम्यान, संजय राऊत वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी विरोधकांकडून उपस्थित केल्यासंदर्भात संजय राऊतांनी खोचक टोला लगावला होता. “अनेक प्रश्नांमध्ये विरोधी पक्षांनी फक्त विरोधासाठी टांग टाकायची गरज नाही. राज्य सुरळीत चालावं ही विरोधी पक्षांची भूमिका असायला हवी. ती आम्हाला दिसत नाही. फडणवीस जेव्हा संन्यास घेण्याची भाषा करतात, तेव्हा ते त्या पक्षाचं वैफल्य आहे. राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या नेत्याने राज्य सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं तर राज्याची जनता त्यांना दुवा देईल”, असं ते म्हणाले होते.