विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी काल चिपळूण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधत असताना, स्थानिक महिलेला अरेरावी केल्याचे समोर आल्यापासून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा, मनसेकडून त्यांच्यावर निशाणा साधला गेला आहे. तर, सोशल मीडियावर देखील भास्कर जाधवांच्या या कृत्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी “हा ‘पुरूषार्थ’ दाखवल्यामुळे धन्य झाले असतील बाळासाहेब…” असं म्हणत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Video : मुख्यमंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांची पूरग्रस्त महिलेला दमदाटी; जाणून घ्या नक्की काय घडलं

“चिपळूण येथील नागरिकांवर पावसामुळे अस्मानी संकट कोसळलयं मात्र स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण येथील पूरग्रस्त महिलेशी केली उर्मट दादागिरी समोर आली आहे, अशी ही वागणूक अत्यंत चुकीचीचं. पूरग्रस्त नागरिकांना धीर देण्याऐवजी मुख्यमंत्रींना खुश करण्यासाठी केलेलं कृत्य निषेधार्हचं.” असं चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे.

तसेच, “माझी कोकणातील भगिनी आपल्या समोर व्यथा मांडण्यासाठीच येत होती ना. तिचे अश्रू पुसणे सोडा तिच्यावरती हात उचलला जातोय… , हा ‘पुरूषार्थ’ दाखवल्यामुळे धन्य झाले असतील बाळासाहेब…” असं देखील चित्रा वाघ यांना म्हटलं आहे.

“भास्कर जाधवांचं वर्तन अत्यंत धक्कादायक”; फडणवीसांनी व्यक्त केला संताप

तर, भास्कर जाधव यांनी आत्मचिंतन करावं. अशा संकटकाळात आपण जनतेचा आक्रोश समजून घ्यायला हवा.  जाधव यांचं हे वर्तन आपल्याला अजिबात योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय! –

याचबरोबर, ”बा भास्कर जाधवा, आज हयसर तुया जी कोकण वासीयांवर जी अरेरावी केलंस मा? त्याका सत्तेचो माज म्हणतत!वाईच वेळ येऊ दे जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय! समजलंय मा?” अशा शब्दांमध्ये भाजपाकडून भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला गेला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांची अरेरावी; सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

राज्यात मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पावासाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून, पूर येऊन घडलेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. तर, अद्यापही अनेक गावं व काही शहरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अतिवृष्टीमुळे कित्येकांचे संसार उघड्यावर आले तर, बरेच जण बेघर देखील झाले आहेत. पुराच्या पाण्यात घरातील वस्तूंसह व्यापाऱ्यांचा दुकानातील माल वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिस्थिती पाहणी करून, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी चिपळूण येथे दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची देखील उपस्थिती होती.