भाजपामधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त ‘सामना’ने दिले आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने एकनाथ खडसेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ आल्याने खडसेंची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये एकनाथ खडसे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. ‘खडसेंनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी सून रक्षा खडसेंसह राहुल गांधी यांची भेट घेतली. या प्रसंगी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे. राज्यात दोन लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या अगोदरच ते वाजतगाजत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही वृत्तात करण्यात आला. २९ जानेवारीला एकनाथ खडसे दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासोबत विमानात पृथ्वीराज चव्हाण हे देखील होते. दिल्लीत खडसे कुटुंबीय रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी मुक्कामी होते. खडसेंनी ‘सामना’शी बोलताना हे वृत्त फेटाळले आहे. पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश या दोघांची योगायोगाने विमानतळावर भेट झाली, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी जळगावमधील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात खडसेंनी पक्षावर नाराज असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. भाजपा सोडण्याची इच्छा नाही, परंतु, आपल्याला पक्षच बाहेर ढकलत आहे. दिवसेंदिवस तशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. अशी अस्वस्थता व्यक्त करीत मला पक्ष सोडण्यास भाग पाडू नका, असा निर्वाणीचा इशाराच खडसेंनी पक्षनेत्यांना दिला होता. खडसेंच्या या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्वरेने प्रतिसाद दिला होता. तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार आहोत, असे काँग्रेस प्रवेशाचे खुले आमंत्रणच चव्हाण यांनी दिले होते. तेव्हापासून खडसे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली.