भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांचा भाऊ व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रम्हानंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी मिरज येथील काही दुकानांवर बुलडोझर चालवला होता. संबंधित दुकानं ज्या जागेवर आहेत, ती जागा आमची आहे, असा दावा ब्रम्हानंद पडळकर यांनी केला. याप्रकरणी १७ जणांनी गोपीचंद पडळकरांच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली. यावर मिरज तालुका दंडाधिकाऱ्यांसमोर चार सुनावण्या पार पडल्या. तालुका दंडाधिकाऱ्यांनी अंतिम निकाल दिला आहे.
हा निकाल आपल्याच बाजुने लागल्याचा दावा भाजपा
संबंधित वादग्रस्त जागेबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “या निकालपत्रात न्यायालयाने म्हटलं आहे की, ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावावर ७८४ (१)(अ) हा प्लॉट आहे. ज्या १७ लोकांनी या जागेसंदर्भात तक्रार दाखल केली आहे, त्यांचा या प्लॉटशी काडीमात्र संबंध नाही. संबंधित तक्रारदारांचा संबंध ७८४ (१) (ब), आणि ७८३ या गटाशी आहे.हा निकाल आमच्याबाजुने लागला आहे. त्यामुळे आमच्या जागेत कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रितसर कायदेशीर कारवाई करून या लोकांना तेथून बाजुला काढणार आहे.” ७८४ (१) (अ) हा १९ गुंठ्यांचा प्लॉट असून याच्याशी १७ जणांपैकी कुणाचाही संबंध नाही, असं तहसिलदारांनी निकालात नमूद केलं आहे, असंही पडळकर म्हणाले.
पडळकर पुढे म्हणाले, “हा निकाल लागण्यापूर्वी आणि निकाल लागल्यानंतर आमच्याविरोधात ज्यांनी-ज्यांनी चुकीच्या पद्धतीने विधानं केली आहेत. त्यांच्याविरोधात मी या निकालाच्या आधारे अब्रु नुकसानीचा दावा करणार आहे. आमच्याविरोधात तक्रार करणाऱ्यांनी तहसीलदारांकडे जे पुरावे सादर केले, ते पुरावे ७८४ (१) (ब), ७८३ आणि ७८४ शी संबंधित आहेत. त्यामुळे या तक्रारदारांचा आमच्या जागेशी काडीमात्र संबंध नाही.”
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader gopichand padalkar on land dispute in miraj magistrate rmm