राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीला आव्हान देत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना माफियांनी अनेक वेळा अशा प्रकारच्या धमक्या दिलाय आणि हल्लेही केले असा आरोप केला. तसेच अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, असं म्हणत प्रतिहल्ला केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला धमकी देणारे हे कोण आहेत? असाही सवाल सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या म्हणाले, “राष्ट्रवादी, शिवसेना माफियांनी अनेक वेळा अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आणि हल्लेही केलेत. हे घोटाळेबाज शेतकऱ्यांना डुबवत आहेत. बेनामी कारोबार करतात आणि चोरी लबाडी करून धमक्या देतात अशा धमक्यांना भीक मी घालत नाही. त्यांनी चोरी केली आहे, त्यांना उत्तर द्यावंच लागेल. हे आमदार नामदार कोण आहेत? उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला धमकी देत आहेत. जरंडेश्वर कारखान्याची चौकशी झाली पाहिजे असं न्यायालयानं सांगितलंय आणि ही चौकशी होणारच.”

हेही वाचा : किरीट सोमय्यांकडून अजित पवारांवर बहिणींच्या नावे बेनामी संपत्तीचा आरोप, सुप्रिया सुळे म्हणाल्या ट्रकभर पुरावे…

“घोटाळ्याचा हिशोब द्या, घोटाळ्यांचे पैसे महाराष्ट्राच्या जनतेला परत करा. घोटाळेबाज ठाकरे-पवार साहेब यांचे माफिया घोटाळे करतात. महाराष्ट्राच्या जनतेला लुटत आहेत आणि नंतर धमक्या देतात. त्यांना घोटाळ्यांचा पैसा महाराष्ट्राला परत करावाच लागेल,” असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले होते?

शशिकांत शिंदे म्हणाले, “भाजपाचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, ते आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. मला वाटतं तेव्हा १०० कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही.”

“ईडी, इनकम टॅक्सच्या बापालाही घाबरत नाही”

“भाजपाला, ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावणारे कुणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी किरीट सोमय्या येथे आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांचा एकदा तोतरेपणा बाहेर काढतो की नाही बघा, पण अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं. आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाला घाबरत नाही आणि आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही,” असंही मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.