Kirit Somaiya : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, अशातच भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. किरीट सोमय्या यांची पक्षाकडून विधानसभेच्या निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. पण किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलं. त्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत त्यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपाच्या नेतृत्वाला नकार कळवला. तसेच भाजपा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक पत्रही लिहिलं. दरम्यान, यानंतर आता किरीट सोमय्या यांनी ट्विव्ही ९ मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “साडेपाच वर्ष कुठलही पद न घेता मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करत आहे”, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : किरीट सोमय्यांनी पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “दिलेली जबाबदारी…”

किरीट सोमय्या काय म्हणाले?

“अनेक काम मला दिलेली आहेत. ती कामे मी करत असतो. त्यामुळे मी पक्षाला असं सुचवलं की, सर्वच कामे मी करत आहे. निवडणूक आयोगाची कामेही मीच करत आहे, म्हणून मला कुठली समिती वैगेरे नको. मग शेवटी पक्षालाही ते पटलं. त्यानुसार पक्षाने त्यामध्ये सुधारणा केली. कोणत्यातरी विषयावर देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे असोत किंवा मी असो. आमच्यामध्ये वेगळं मत असू शकतं. या मुद्यावर माझं वेगळं मत होतं”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

“गेली साडेपाच वर्ष कोणतंही पद माझ्याकडे नाही. भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे अमित शाह यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यायला तयार नव्हते. तेव्हा पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांनी मला निघून जायला सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत मी जीव लावून काम केलेलं आहे. मला कुठल्याही पदाची गरज नाही. आता हे त्यांनाही पटलं. आम्ही काम जोराने करत आहोत. नाराजी वैगेरे नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

“मला दिलेल्या संधींचं सोनं करण्याचा प्रश्न उद्धभवत नाही. माझ्यासाठी देश प्रथम आहे, त्यानंतर भाजपा आहे. मी २०१९ मध्ये लोकसभेतही तेवढंच काम केलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही तशाच प्रकारे काम केलं होतं. मी भाजपाचा एक सदस्य आहे”, असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून माफियागिरी केली. आम्ही त्यावेळी पुरावे दिले. खुन्नस काढण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही. राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना ३३ महिन्यांत विकासाच्या प्रकल्पांची कशी वाट लावली? ही एकएक गोष्ट जनतेसमोर येईल”, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya explanation on the talks of being unhappy in the bjp party gkt
Show comments